Breaking News

राजकारणाला वेगळे स्वरूप देण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील

पनवेल : प्रतिनिधी
राजकारण म्हणजे दुकान, गुन्हेगारी असा अर्थ काढला जातो, परंतु त्याला विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न खाऊंगा और न खाने दुंगा हे कल्चर देशात निर्माण करून देशाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 14) येथे केले.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रायगडचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, उपाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, युवा नेते समीर कदम, तानाजी खंडागळे, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, देवीदास केळकर, राजन पिल्ले, सुनील सिन्हा, महेंद्र पाटील, हॅप्पी सिंग, नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, मनोज भुजबळ, बबन मुकादम, विकास घरत, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, रूचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या मते सर्वसामान्य माणूस त्याला शक्य नसल्याने त्याच्या वतीने नगरपालिकेत, विधानसभेत, लोकसभेत काम करण्यासाठी आपल्याला निवडून देतो. अशी आमची निवडणुकांकडे बघण्याची भूमिका आहे. म्हणून पंतप्रधान मोदीजी म्हणतात राजकारण म्हणजेच समाजकारण. सेवा ही संघटन. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांनी मूलभूत गरजा भागवल्या. दुसर्‍या टप्प्यात कलम 370, तिहेरी तलाक आणि रामजन्मभूमी यांसारख्या बेसिक प्रश्नाला हात घातला. परिणामस्वरूप भाजपला 2019मध्ये लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या, तर 2024मध्ये 418 जागा मिळतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.  
या वेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली. ही महाभकास आघाडी असून त्यांना राज्यघटना मंजूर नसल्याने कोणती चौकशी लागली की ती भाजपमुळेच लागली असे म्हणतात, तर निवडणूक हरले की ईव्हीएममध्ये गडबड आणि जिंकले की ईव्हीएम बरोबर आहे सांगतात, असा टोला पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, त्रिपुरात मशीद पाडल्याचा खोटा व्हिडीओ पसरवला गेला. अमरावतीत 15-20 हजार मुस्लिम रस्त्यावर आले. त्याची प्रतिक्रिया दुसर्‍या दिवशी 50 हजार हिंदू रस्त्यावर आल्याने संजय राऊत यामागे भाजप असल्याचा आरोप करतात. मग आदल्या दिवशी जे रस्त्यावर आले त्यामागे राऊत यांचा हात आहे का? आम्ही करू ते बरोबर. आम्हाला निवडणुकीत मिळेल तो कौल बरोबर असा विचार करणार्‍या महाभकास आघाडीला हे समजात नाही की निवडणुका या घटनेला अनुसरून होतात. त्या जिंकणार्‍याच्या हाती राज्य येते. त्यामुळे तिजोरी येते व त्यातून विकास करता येतो हा अर्थ त्यांना समजत नाही. त्यांना फक्त पैसे कमवणे समजते.
राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य करताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, आपण हरलो नाही, तर आपला विश्वासघात केला गेला. या देशात विश्वासघाताचे जे फळ आहे ते काळासोबत मिळतेच. आज महाविकास आघाडीचे निम्मे मंत्रिमंडळ आत जाण्याच्या तयारीत आहे. काही सुपात आहेत, तर काही जात्यात आहेत. जे करावे ते भरावे लागेल. जे काम करतो तेथे यश मिळते. मोदी है तो मुमकीन है. या वेळी त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भाषणाचेही कौतुक केले.  
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जनसेवा कार्यालय सुरू केल्याबद्दल विक्रांत पाटील यांचे अभिनंदन करून या कार्यालयात लोकांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचा किस्सा सांगून या कार्यालयाकडे जीवंत कार्यालय म्हणून बघा, असा सल्लाही दिला.
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही राज्यात त्या वेळी शिवसेनेबरोबर युती असल्याने पनवेलला महापालिका निवडणुकीतही युती करण्याचा प्रयत्न केला, मात्र पनवेलमध्ये पहिल्यांदा शिवसेनेने युती तोडली आणि त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही हे पनवेलकरांनी पाहिले. त्यानंतर राज्यात त्यांनी केलेली गद्दारी सारा महाराष्ट्र पाहतोय. यांच्या गद्दारीमुळे त्वेषाने लढणारा कार्यकर्ता शत:प्रतिशत भाजपच्या बाजूने चालला आहे. दादा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे की एकदा यांची खुमखुमी काढली पाहिजे. तो अधिकार आम्हाला द्या.  
आजपर्यंत विक्रांत पाटील यांना त्यांच्या आई-वडिलांनी जेवढ्या वेळा उचलून घेतले नसेल, त्याहून जास्त पोलिसांनी आंदोलनादरम्यान उचलले आहे, असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या वेळी युवा वॉरियर्सच्या नामफलकाचे अनावरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  

भाजपवर जनतेचा विश्वास -आमदार प्रशांत ठाकूर
आपल्या भाषणात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, मी 2014मध्ये खारघरच्या टोल प्रश्नावरून भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवून विजयी झालो. त्यानंतर हा टोल माफ करण्यास अधिकार्‍यांनी विरोध केला तरी चंद्रकांतदादा आणि देवेंद्रजींनी इथल्या जनतेला दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी टोल माफ केल्याचे सांगून भाजप राज्यात सत्तेत नसली तरी येथील जनतेला गरज असेल त्या वेळी वादळ, पूर किंवा कोरोना काही असो भाजप धावून गेली आहे. श्रीवर्धन परिसरात दादांनी सौरकंदील उपलब्ध करून दिले. या पद्धतीचे काम करीत असल्याने लोकांचा भाजपवर लोकांचा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले

मी या प्रभागाचा देणे लागतो, येथील नागरिकांचे देणे लागतो ही भावना सातत्याने माझ्या मनात असते. नगरसेवकांकडून लोकांची असलेली अपेक्षा पूर्ण करून देण्यात कोठे मागे पडू नये ही माफक अपेक्षा आहे. नगरसेवक  आपल्या कुटुंबातील सदस्य आहे. आपली समस्या तो सोडवू शकेल अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण करायची आहे. नागरिक हीच माझी संपत्ती आहे.
-विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा व नगरसेवक

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply