Breaking News

डोलकाठीचा गरूडध्वज ढाक डोंगरावरून आणला; कर्जत देऊळवाडीची यात्रा यंदाही रद्द, भैरीनाथाचे दर्शन मिळणार

कर्जत : प्रतिनिधी

देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला, मात्र यंदाही कोरोनाच्या संकटामुळे कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ज्येष्ठ वारकरी नारायण बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थानचे सचिव दिलीप बडेकर, दिव्यांग जनार्दन पानमंद, अनिल खंडागळे, नितीन बडेकर, अरविंद बडेकर, बिपिन बडेकर, विवेक पाटील, राजेश बडेकर, रवी बडेकर, जनार्दन बडेकर, केतन बडेकर, संदीप बडेकर, सुनील अहिर, सुमित गायकर, सनी गायकर, किरण गायकवाड, नयन बडेकर आदी ग्रामस्थ गरुडध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले होते. गरुडध्वज ढाक भैरी मंदिरात आणल्यानंतर त्याची पूजा दिलीप बडेकर यांच्या हस्ते करून अभिषेक करण्यात आला. हे सारे भाविक हा गरुडध्वज देऊळवाडी येथे घेऊन आले. हा ध्वज डोलकाठीच्या तुर्‍यावर बांधण्यात येणार आहे. त्यांनतर गुरुवारी (दि. 18) सकाळी ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येणार आहे. शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीच्या मोरपिसार्‍याने शिवमंदिरातील शिवपिंडीला वारा घालून ही 30 फूट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन नाचविण्यात येते. हे दृश्य फारच रोमांचकारक असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देऊळवाडी किरवली येथील यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिर परिसरात केवळ हार, फुलांची दुकाने असणार आहेत. भाविकांना शासकीय नियम पाळून दर्शन देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा यात्रा रद्द केली आहे. हार, फुलांव्यतिरिक्त कोणत्याच प्रकारची दुकाने लावण्यात येणार नाहीत, मात्र दर्शनासाठी मंदिर खुले राहील. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांसाठी मास्क अनिवार्य असणार आहे. सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन दिले जाणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे.

-दिलीप बडेकर, सचिव, श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान देऊळवाडी किरवली, ता. कर्जत 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply