माणगावात वडेट्टीवारांचा खासदार तटकरेंवर निशाणा
माणगाव : प्रतिनिधी
कुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई येथील वसतिगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मी माझ्या खात्यामार्फत दिला, मात्र बॅनरवर फोटो दुसर्यांचे लागले. काँग्रेसच्या जीवावर मोठा होऊन कुणी फणा काढीत असेल, तर त्याला चिरडून टाकण्याची ताकद निश्चितच काँग्रेसमध्ये आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माणगाव येथील आढावा बैठकीत बोलताना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना लगावला.
माणगाव नगरपंचायतीच्या येणार्या निवडणुकीसाठी माणगावात गुरुवारी (दि. 18) आढावा बैठक ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना वडेट्टीवार यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. या बैठकीला प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी चारुलता टोकस, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्या नंदा म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, आपण जरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलो, तरी प्रत्येक पक्षाला आपली संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे. राज्यातील तीन पक्षांच्या सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपाचा तोडगा निघाला, तर ठीक नाहीतर आपण स्वतंत्र लढू. रायगडात नारळ फोडा, बोर्ड लावा मरावे परी कीर्ती बोर्ड रूपी उरावे, असा चिमटा काढत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला मारला.
ज्यांना निवडून दिले ते आम्हाला विचारतच नाहीत -महेंद्र घरत
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत या वेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जीवावर जे खासदार झालेत त्यांना कापण्याचे काम आपल्याला करायचेय. स्व. बॅरिस्टर अंतुले साहेब असतील तसेच स्व. माजी आमदार माणिकराव जगताप व स्व. माजी आमदार मधुकर ठाकूर यांना पाडण्याचे पाप ज्यांनी केले त्यांनाच आपण खासदार म्हणून निवडून दिले आहे. ज्यांना आम्ही निवडून दिले ते निवडणुकीअगोदर मला निवडून द्या मी आघाडीचा खासदार म्हणून काम करेन असे सांगत होते, मात्र निवडून आल्यावर ते आम्हाला विचारतच नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी आम्ही यापुढे राहणार नाही, त्यांचे काम करणार नाही. अनेक वर्ष मी त्यांच्याशी संघर्ष केलाय.