पनवेल : रामप्रहर वृत्त
ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन पनवेल तालुक्यात करण्यात आले होते. तीन दिवस ही जनजागर रथयात्रा सुरू असून, मंगळवारी (दि. 23) चिंध्रण, महाळुंगी वाकडी या ठिकाणी रथयात्र मार्गक्रमण करत आकुर्ली येथे या यात्रेचा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. सरकारने केवळ तात्पुरता अध्यादेश काढून ओबीसी समाजाची दिशाभूल चालवली आहे. हे सरकार ओबीसी समाजाबाबत उदासीन आहे. ओबीसी समाजाला गृहित धरले जात आहे. या वेळी जर ओबीसी समाज एकत्र आला नाही, तर ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि सामाजिक अस्तित्वदेखील धोक्यात येईल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र यावे यासाठी हे अभियान राबवले जात आहे. यानुसार रविवारी पनवलमध्ये या जनजागर रथ यात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण तालुक्यात तीन दिवस मार्गक्रमण करत मंगळवारी आकुर्ली येथे या रथयात्रेचा समारोप झाला.
या वेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अप्पा भागीत, शिवाजी दुर्गे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, चिंध्रण ग्रामपंचायत सरपंच कमला देशेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.