केंद्रीय मंत्र्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन
कर्जत : प्रतिनिधी
माथेरानमधील घोड्यांवर तात्काळ उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन केंद्रीय पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपात यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे अश्व तसेच अश्वमालकांना दिलासा मिळाला आहे.
मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. माथेरानमध्ये 460 परवानाधारक घोडे आहेत तसेच इतरही पाळीव प्राणी आहेत, मात्र येथील पशुवैद्यकीय दवाखाना नेहमी बंद असतो. डॉक्टर नसल्यामुळे घोडेमालकांची कुचंबणा होते.
आजारी किंवा अपघातग्रस्त घोड्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करता यावेत यासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या मागणीकरिता माथेरानमधील भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री मंत्री पुरुषोत्तम रूपात यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली.
या शिष्टमंडळात आमदार महेश बालदी, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेवक राकेश चौधरी, संदीप कदम, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, कार्याध्यक्ष किरण चौधरी, चिटणीस संजय भोसले आणि युवा नेते किरण ठाकरे यांचा समावेश होता. या वेळी मंत्री रूपात यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठविल्यास माथेरानसाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका दिली जाईल, असे आश्वासन दिले.