Breaking News

सहकार चळवळ पुढे नेणार – अमित शाह

अहमदनगर ः प्रतिनिधी
सहकार क्षेत्राच्या चळवळीला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. त्यामुळे येणार्‍या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती देईल, असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि. 18) दिले. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित देशातील पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते.
व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे-पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
अमित शाह यांनी म्हटले की, विठ्ठलराव विखे-पाटील यांनी दूरदृष्टीतून शेतकर्‍यांच्या विकासासाठी साखर कारखाना सुरू केला. हा कारखाना आजही सहकारी पद्धतीने सुरू आहे याचा मला आनंद वाटतो. कारण अनेक सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. कमीत कमी एक साखर कारखाना जपून ठेवला आहे आणि तो व्यवस्थितपणे चालवत आहेत याचा मला खूप आनंद आहे.
स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन का केले असे विचारणार्‍यांना उत्तर द्यायला मी आलोय असे सांगत शाह म्हणाले की, देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण 31 टक्के साखरेचे उत्पन्न होते. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचे 20 टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. 13 टक्के गहू, 20 टक्के तांदुळाची खरेदी सहकार क्षेत्र करते. 25 टक्के खतांचे उत्पादन आणि वितरण दोन्ही सहकाराच्या माध्यमातून होते. येत्या काळात सहकारी नीती येईल. याद्वारे पुढील 25 वर्षे सहकारात प्राण फुंकण्याचे काम केले जाईल.
‘सहकारी चळवळ धोक्यात आल्याचे सांगणारेच खाजगी कारखान्यांचे मालक’
या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांवर अप्रत्यक्ष शब्दांमध्ये निशाणा साधला. अनेक लोक सहकारी चळवळ धोक्यात आहे असे सांगतात, पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत आणि ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकाराचे कारखाने खासगीत त्यांनी नेले आहेत आणि आता तेच शिकवतायत की सहकार चळवळ अडचणीत आहे, असे फडणवीस म्हणाले. माझा त्यांना सल्ला आहे की जर सहकार चळवळ अडचणीत आहे, तर तुम्ही त्या चळवळीला मदत करा, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply