Breaking News

…तर राज्यात कडक निर्बंध !

आरोग्यमंत्र्यांचे संकेत; लसीकरणाबाबतही चिंता

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केले आहे. ते बुधवारी (दि. 29) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मागील आठ दिवसांत पाहिले तर 20 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहादरम्यान अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात 11 हजार 492 रुग्ण आहेत. सात दिवसांत सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसांत डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे.
दिल्लीत बर्‍यापैकी निर्बंध वाढवण्यात आले आहेत. जुने सर्व निर्बंध त्यांनी आणले आहेत. मॉल्स, रेस्तराँ, लग्न सर्वांवर निर्बंध लावले आहेत. आपल्याकडेही कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचे नियम कठोरपणे पाळावे लागतील, पण जर आपण नियम पाळणारच नसू तर निर्बंधांमध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न तसेच मोठे कार्यक्रम नियम न पाळता होत आहेत. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला यावर बंधने आणावी लागतील, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री, टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यासंबंधी एकत्रितपणे निर्णय घेईल. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन वाढत असलेला पॉझिटिव्हिटी रेट, रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासंबंधी सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत आज किंवा उद्या बैठक होणार असून निर्बंध वाढवण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी टास्क फोर्सचे मत विचारात घेतले जाईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply