Breaking News

राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी -चित्रा वाघ

सरपंच खूनप्रकरणी एकाला अटक

महाड ः प्रतिनिधी
महाडमध्ये सरपंच महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत असून ठाकरे सरकार महिलांना संरक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 29) महाड येथे पत्रकार परिषदेत केला.
आदिस्ते येथील महिला सरपंच मिनाक्षी खिडबीडे यांचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला होता. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आदिस्ते येथे येऊन त्यांची भेट घेतली तसेच गुन्हा घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. हा गुन्हा एका व्यक्तीने केलेला नसून एकपेक्षा जास्त जण यात सामिल असल्याचा दावा त्यांनी केला. तांबडी येथील प्रकरणातदेखील सुरुवातीला पोलिसांनी एक आरोपी पकडला होता, मात्र त्या प्रकरणात एकपेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता असल्याचे मी बोलले होते व तसेच झाले, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकारच्या काळात गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याचे भय राहिले नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच कबूल केले की आपल्या राज्यातून 25 हजार महिला गायब आहेत, असे वाघ यांनी सांगून महाराष्ट्रात फास्ट्रॅक कोर्ट नसल्याचा धक्कादायक खुलासा या वेळी केला तसेच फॉरेन्सिक लॅबची 50 टक्के पदे रिक्त असून बलात्कार प्रकरणातील पुरावे गोळा करून जतन करण्याचे 700 किट केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले होते. त्या किटचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चित्रा वाघ यांच्यासोबत भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, सदस्य मंजुषा कुद्रीमोती, भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply