पुणे : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 2) झाली. त्याला प्रतिसाद लाभला.
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या यंदाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रभरातून 108 संस्थांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत जळगाव, नागपूर व पुणेनंतर रायगड केंद्रासाठीची प्राथमिक फेरी रविवारी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रंगली. या वेळी नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्पर्धा प्रमुख गणेश जगताप, खजिनदार अमोल खेर, कार्यसमिती सदस्य अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, केंद्रप्रमुख संजीव कुलकर्णी यांनी नियोजन पाहिले, तर परीक्षक म्हणून प्रमोद शेलार व अभिजित झुंझारराव यांनी कामगिरी बजावली.
रायगड केंद्रातंर्गत प्राथमिक फेरीत 12 एकांकिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये फ्रायडे फिल्मस् आणि निषाद एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘गुज’, कोकण ज्ञानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालयाची ‘त्रिशंकु’ आणि सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाची ‘105 अ व क’ या एकांकिकांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले. त्यांना अनुक्रमे 10 हजार, सात हजार व पाच हजार रुपये आणि तिघांनाही प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आगामी काळात मुंबई केंद्रासाठी 6, 7, 8, 9 जानेवारी या कालावधीत प्राथमिक फेरी होईल. त्यानंतर सर्व ठिकाणच्या प्राथमिक फेर्यांतून 24 एकांकिकांची महाअंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. मग महाअंतिम फेरी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 28, 29, 30 जानेवारी रोजी होणार आहे.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper