मुंबई ः प्रतिनिधी
राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. 2004 सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसर्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठ्या जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील वर्षी कोरोनामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा रद्द करणे भाग पडले होते. यंदा मुंबईतील कोरोनाचा धोका कमी होईल आणि मॅरेथॉनचे नियमितपणे आयोजन करता येईल, अशी संयोजकांना आशा होती, मात्र कोरोनासह नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परदेशी नागरिकांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.