Breaking News

लोखंडी प्लेट तुटल्याने बंधार्यातील पाणी गेले वाहून

कर्जत बोरगाव येथील शेतकरी हवालदिल

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पोश्री नदीवरील बोरगाव येथे याच वर्षी बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यात भरपूर पाणी साठले होते, मात्र त्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट गुरुवारी (दि. 13) रात्री तुटल्या आणि बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले. या बंधार्‍याच्या पाण्यावर किमान 50 एकर जमिनीवर भाजीपाला शेती केली आहे. त्या शेतीसाठी आता पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे पोश्री नदीवर जलसंधारण विभागाने 2021मध्ये 73 लाख रुपये खर्च करून 83 मीटर लांबीचा सिमेंट बंधारा उभारला होता.

त्या बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे बोरगावातील 30 शेतकर्‍यांनी पाच एकर जमिनीवर भाजीपाला लावण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी  कृषिपंप लावून सिमेंट बंधार्‍यातील पाणी नेण्याची तजवीज केली आहे. मात्र गुरुवारी रात्री अचानक त्या बंधा़र्‍यात असलेल्या चार पैकी एका लोखंडी प्लेटमधून पाणीगळती सुरु झाली आणि शुक्रवार सकाळपर्यंत बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले आहे. या बंधार्‍यात आता पाणीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे लागवड केलेला भाजीपाला कसा जगावयाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बंधार्‍याला लावलेल्या लोखंडी प्लेट जुन्या होत्या. पाण्याच्या दाबामुळे त्यातील एक प्लेट तुटून बंधार्‍यात साठलेले पाणी वाहून गेले, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

दरम्यान, सिमेंट बंधार्‍यातील लोखंडी प्लेट तुटल्याने पाणी वाहून गेल्याची माहिती मिळताच जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी सकाळी बोरगाव येथे जाऊन बंधार्‍याची पाहणी केली.

पोश्री नदीमध्ये सध्या थोड्याफार प्रमाणात पाणी वाहत आहे. तुटलेल्या लोखंडी प्लेट बदलून बोरगाव बंधार्‍यात पुन्हा पाणीसाठा होईल का? याची माहिती जलसंधारण विभाग घेत आहे.

सिमेंट बंधार्‍यातील पाण्यावर भाजीपाला शेती करून उदरनिर्वाह होईल, म्हणून गेली दोन महिने आम्ही मेहनत करतोय. आता शेतात रोपेही दिसू लागली आहेत. मात्र  बंधार्‍यातील पाणी वाहून गेले आणि शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

-राकेश यशवंत खडेकर, शेतकरी, बोरगाव, ता. कर्जत

बंधार्‍याच्या चारपैकी एका दरवाजाच्या लोखंडी प्लेट अज्ञात व्यक्तीने वाकवल्यामुळे साठलेले पाणी वाहून गेले आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार आहोत. मात्र शेतकर्‍यांना पाणी कसे देता येईल, याचा विचार प्राधान्याने करीत आहोत.

-दिलीप नलावडे, उपअभियंता, जलसंधारण विभाग, कर्जत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply