Breaking News

पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी खोळंबली

अष्टविनायक क्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील बसस्थानक देखणे व सुसज्ज असणे अपेक्षित होते. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा व पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम आजही रखडले आहे.

जीर्ण आणि जर्जर झालेल्या पाली बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापुर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास अजूनही सुरुवात झालेली नाही. तेथे जणूकाही खंडर झाले आहे. इमारत बांधणी व  स्थानकात नुतनीकरण कामांसाठी तब्बल दोन कोटी 36 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र ठेकेदाराला चालू वाढीव दर हवे असल्याने काम खोळंबले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाली बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या उभारणीकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झाले असल्याचेदेखील समोर येत आहे.

मोडकळीस आलेली पाली बसस्थानकाची जुनी इमारत पाडली खरी मात्र जुन्या इमारतीचा राडारोडा येथे तसाच ठेवण्यात आला आहे. बाजूला तात्पुरत्या स्वरूपात प्रवासी व कर्मचारी शेड बांधण्यात आली आहे. मात्र परिपूर्ण बस स्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे.

अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या पाली बस स्थानकाची इमारत तोडून त्याठिकाणी नवीन इमारत उभी रहावी यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून वारंवार राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांकडून उपोषणे व आंदोलनेदेखील करण्यात आली. 2016 मध्ये रिपाइंचे रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी नवीन बस स्थानकाकरिता आमरण उपोषण केले होते. त्यावेळी त्यांच्या उपोषणाला व नागरिकांच्या मागणीला यश आले आणि पाली बस स्थानकाच्या नवीन इमारतीकरिता राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करण्यात आला. परंतु काही वर्षे जाऊनसुद्धा परिवहन महामंडळाकडून बस स्थानकाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दरम्यान, रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी पुन्हा मागील वर्षी मार्च महिन्यात पाच दिवस उपोषण केल्यानंतर नवीन इमारत बांधण्यासाठी परिवहन महामंडळाकडून बस स्थानकाची जुनी, धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. त्याला वर्ष उलटून गेले तरी परिवहन महामंडळ नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.

नवीन बस स्थानक नुतनीकरणासाठी तब्बल दोन कोटी 36 लाखांचा निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला होता. यामध्ये नवीन सुसज्ज भव्य इमारतीसह विविध सुविधा आदींचा समावेश होता. तसेच इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार होती. मात्र तीन वर्ष उलटूनही अजून एक वीटसुद्धा बसविण्यात आलेली नाही. चालू दराप्रमाणे आता ही रक्कम तीन कोटीची होण्याची शक्यता आहे.

ठेकेदाराला भाववाढ देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यास, किंवा ठेकेदार बदलल्यास आणि वाढीव दरासाठी नवीन निविदा काढली तर या सर्व प्रक्रियेला खूप उशीर होईल. आणि प्रत्यक्षात स्थानक पुनर्बांधणी काम सुरू होण्यास 7 ते 8 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जाण्याची शक्यता आहे.

पाली एसटी स्थानकाला संरक्षक भिंत नाही. जुन्या इमारतीचा राडारोडा तिथेच पडून आहे. बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. बस स्थानकाच्या आवारात पालीतील सांडपाणी येते. ते साचून दुर्गंधी व घाण पसरली आहे. या सांडपाण्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांना शौचालयाची व्यवस्थित सोय नाही. मद्यपींमुळे स्थानक परिसर दारूचा अड्डा बनला आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दोन नाल्यांपैकी एका नाल्यावरील एक स्लॅब तोडला असल्याने गाड्यांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या उघड्या नाल्यामुळे घाण व दुर्गंधी पसरली आहे. या उघड्या नाल्यात एक बाईकस्वारदेखील कोसळला होता. स्थानकाच्या बाजूने प्रचंड झाडीझुडपे वाढली आहेत. पाली बस स्थानक हे खाजगी वाहनांच्या पार्किंगचे ठिकाण बनले आहे.

उपोषणांतर रायगड परिवहन विभागीय नियंत्रकांकडून पाली बस स्थानकाच्या तात्काळ पुनर्बांधणीचे लेखी पत्र देण्यात आले होते. एक वर्ष उलटून गेले तरीही कोणत्याच कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे प्रवाशी व कर्मचार्‍यांची खूप गैरसोय होत आहे. पुढील महिन्यात  बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होईपर्यंत उपोषण करणार आहे.

-रवींद्रनाथ ओव्हाळ, आंदोलनकर्ते, पाली

ठेकेदाराने तात्पुरते बसस्थानक बांधून दिले. नंतर कोरोना काळात ठेकेदाराने नवीन बसस्थानकाचे काम सुरू केले नाही. त्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू केली आहे. आता ठेकेदाराला वाढीव दर हवे असल्याने काम सुरू झालेले नाही. भाववाढ मिळण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवत आहोत. ठेकेदार काढल्यास नवीन टेंडर काढून दुसरा ठेकेदार निवडण्यात येईल.

-विद्या भिलारकर, कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply