Breaking News

नवी मुंबईत भित्तिचित्रे रंगवून जनजागृती; स्वच्छतेसाठी कलाकृतीतून आवाहन

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भित्तिचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके केले जात आहे. त्यामुळे शहराला या चित्रांमुळे जिवंतपणा आला आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस, व रहेजा या नामवंत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांकडून ही भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई सजू लागली असताना दुसर्‍या बाजूने नागरिकांची जबाबदारीदेखील तितकीच वाढली आहे. नागरिकांनी थुंकलेल्या, लघुशंका केलेल्या पडपाथांवर बसून चित्रे रेखाटताना आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. अशा सुंदर भिंतींवर पाडपथांवर आतातरी थुंकणे, लघुशंका व कचरा टाकणे थांबवा, असे आवाहन हे विद्यार्थी आपल्या कलाकृतीतून करत आहेत. नवी मुंबई महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी सरसावली आहे. शहर स्वच्छतेसोबत नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी विविध उपायांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. पालिकेकडून नागरिकांसाठी अडथळा मुक्त पदपथ तयार करून चालणे सुलभ केले आहे, मात्र दुसर्‍या बाजूस काही नागरिकांकडून  या पदपथांवरून चालताना अस्वच्छतेचे अडथळे आणले जात आहेत. भिंतींवर थुंकून भिंती अस्वच्छ करण्यात येत असल्याने महापालिकेने शहरातील सर्व भिंतीच रंगवण्याची कल्पना अंमलात आणल्याने शहराला जिवंतपणा आला आहे. त्यानुसार भिंती आकर्षक चित्रांनी सजवल्या जात आहेत. जे जे व रहेजाचे विद्यार्थी तासनतास पडपथांवर एकाजागी बसून आपले कसब पणाला लावून भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. त्यात आकर्षक रंगांची उधळण करत त्यात जिवंतपणा ओतला जात आहे. नवी मुंबईकरांकडून या कल्पनांचे कौतुक होत असले तरी काही नागरिकांकडून मात्र या स्वच्छतेला हरताळ फसली जात आहे. या सुंदर चित्रे काढली गेली असताना भिंती अनेकांकडून थुंकून घाण करण्यात येत आहे, मात्र निदान या थुकणार्‍यांनी दिवसभर राबून तासनतास एकाजागेवर बसून आपले कसब पणाला लावत कल्पनातीत कलाकृती साकारणार्‍या कलाकारांची कदर करणे गरजेचे आहे. थुंकलेल्या भिंतींवर हे कलाकार भिंती हाताने स्वच्छ करत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात आपल्या थुंकीतून पसरणार्‍या आजारातून समस्त मानवजातीला धडा मिळाला आहे. यातून मनुष्याने या रोगातून वाचण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात केल्या आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून; थुंकीतून पसरतो, मात्र तरीही नवी मुंबईकर थुंकण्याचे व्यसन सोडण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. आपली घाण कोणी दुसरा मनुष्य स्वच्छ करतो याबाबत प्रत्येक नागरिकाने मानवतेच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply