Saturday , June 3 2023
Breaking News

भाजपमध्ये कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात

अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर ध्येय ठेवले पाहिजे, तसेच त्यांनी स्वप्नदेखील पाहिली पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की, ज्या पक्षात कार्यकर्त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांनी केले. ते रविवारी (दि. 30) पनवेलमध्ये आयोजित कोकण विभागीय आढावा बैठकीत बोलत होते.
भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीस अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी इजाज देशमुख, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस अतिक खान, सचिव बबलू सय्यद, उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक मुनोवर पटेल, उपाध्यक्ष सय्यद अकबर, महबूब खैरवा, युसुफ पठाण, कार्यकारिणी सदस्य अनिस अन्सारी, भाजप शहर उपाध्यक्ष अमरीश मोकल, तबस्सूम बैरागदार, इफ्तेखार आतार, जसिन ब्यास,रियान तुंगेकर, निसार सय्यद, साबीर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भाषणात हाजी जमाल सिद्दिकी पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला एका सक्षम राजकीय पक्षाची आवश्यकता आहे. आणि तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी अल्पसंख्याक समाज हा त्यांची व्होट बँक असल्याचे गृहीत धरले आहे, परंतु सबका साथ सबका विकास असे म्हणत जे देशाचे नेतृत्व सक्षमपणे करीत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. ज्यांनी सर्वप्रथम देश, मग पक्ष आणि नंतर मी असे सूत्र आपल्याला दिले आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये सक्षम आणि पक्ष विचाराला समर्पित झालेला कार्यकर्ताच पुढे जाऊ शकतो. येथे वशिलेबाजीला थारा नाही. मी पदाधिकार्‍यांना विनंती करेन की त्यांनी जास्तीत जास्त प्रवास करून बूथ, मंडल, जिल्हा पिंजून काढले पाहिजेत. आपला व्यवसाय, कारभार, नोकर्‍या हे सारे सांभाळून आपल्याला संघटन मजबूत करायचे आहे. संघटन हे समूहाचे काम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक जोडून सगळ्यांनी मिळून केल्यास ते अधिक प्रभावीपणे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे रसग्रहण केले. प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी बैठकीचे सुयोग्य नियोजन केले होते. सूत्रसंचालन सुमेधा लिम्हण यांनी केले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply