Breaking News

अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचवा

शासनाने उपाययोजना करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका क्षेत्र व परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोना रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे, याची माहिती समस्त पनवेलकर जनतेला मिळावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मंगळवारी (दि. 12) केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात, मुंबई महापालिकेत पनवेल व इतर भागातून रोज कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पाऊले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्याचे नमूद करून या संदर्भात मुंबई महापालिकेतर्फे या कर्मचार्‍यांची सोय मुंबईमध्येच करण्याचे जाहीर झाले होते, परंतु याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.    
पनवेल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण म्हणून ज्यांची नोंद आहे त्यापैकी बहुतांश मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे अथवा त्यांचे परिवारजन आहेत. अशा सर्व शासकीय व खाजगी सेवाकर्मीची रोगाचे संक्रमण थांबेपर्यंत मुंबईत रहाण्याची व्यवस्था करता येत नसल्यास किमान त्यांना व त्यांच्या परिवारजनांना कोरोना रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार याची माहिती लोकप्रतिनिधी म्हणून मला व पनवेल तालुक्यातील नागरीकांना तातडीने मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे केली असून, अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचविण्यासाठी शासनाने उपाययोजना करावे, असेही सूचित केले आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply