अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले
अँटिग्वा ः वृत्तसंस्था
आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये धडक दिली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने 96 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान यश धुल आणि शेख रशीद यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 291 धावांचे आव्हान दिले. यशने शतक साजरे केले, तर रशीद शतकी उंबरठा ओलांडण्यापासून फक्त सहा धावांनी हुकला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारताचे लक्ष्य पेलवले नाही. 194 धावांवर भारताने ‘कांगारूं’ना गुंडाळले. भारत आता इंग्लंडविरुद्ध 5 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळणार आहे.
अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंग यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या 16 धावा फलकावर लावल्या अंगक्रिश (6) बाद झाला. हरनूरही लवकर (16) माघारी परतला. त्यानंतर कप्तान यश धुल आणि शेख रशीदने संघाला आधार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यावर या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. 45व्या षटकात यश धुलने आपले शतक साजरे केले. शतकानंतर तो बाद झाला. त्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 110 धावांची जबरदस्त खेळी केली. पुढच्याच षटकात रशीद निस्बेटच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्याचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. शेवटच्या पाच षटकांत दिनेश बानाने चार चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांसह नाबाद 20 धावा ठोकल्या. अशा प्रकारे 50 षटकांत भारताने 5 बाद 290 धावा उभारल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. रवी कुमारने टीग वायलीला (1) स्वस्तात बाद करत ‘कांगारूं’ना पहिला धक्का दिला. त्यानंतर कॅम्पबेल केलावेने आलेल्या कोरी मिलरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. अंगक्रिश रघुंवशीने ही भागीदारी मोडली. त्याने मिलरला (38) पायचीत पकडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव घसरला. त्यांनी 101 धावांवर पाच फलंदाज गमावले. भारताच्या विकी ओसवालने पुन्हा आपला खेळ बहरवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्याने शुल्झम आणि स्नेलला बाद करीत ‘कांगारूं’च्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. 41.4 षटकांत ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांवर संपुष्टात आला. ओसवालने तीन, तर रवी कुमार आणि निशांत सिद्धूने प्रत्येकी दोन बळी टिपले.