Breaking News

विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका -भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.2) कार्यकर्ता संवाद मेळावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि येथील निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ही फक्त निवडणूक नाही, तर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका, असे आवाहन केले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे म्हटले की, पनवेलमधील जनतेने भाजपवर नेहमीच विश्वास टाकला आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. संघटनात्मक ताकद, विकासकामांचा लेखाजोखा आणि जनतेशी थेट संवाद याच्या जोरावर पनवेलमध्ये भाजप महायुती मोठा विजय निश्चितपणे मिळवेल. या वेळी त्यांनी प्रचारात शिस्त, संयम आणि सकारात्मक भूमिका ठेवण्याचे निर्देश दिले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा संदेश घराघरात पोहचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतीने काम करत आहेत. त्यामुळे गतिमान सरकारला जनतेचा पाठिंबा आहे. मतरदारांचा कौल भाजप महायुतीला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस दिवसातून सोळा सोळा तास काम करत आहेत. भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपणही काम करत राहिले पाहिजे. बूथची सर्वात मोठी ताकद असलेला आपला पक्ष आहे. 20 प्रभागात होणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे बूथ रचनेतून काम करा, प्रत्येक मतदार नागरिकापर्यंत पोहचा, मोदीजी, देवेंद्रजी यांनी आणि भाजप महायुतीने केलेल्या कार्याची माहिती संवादातून द्या, असा मौलिक सल्लाही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकाभिमुख कार्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर दोन दोन तास बोलू शकतात ते नेहमी आपल्या भाषणात मोदीजी, देवेंद्रजींच्या कार्याचा गौरव सांगतात आणि त्यातून ते कार्यकर्त्यांना चार्ज करत असतात. जगातील विद्यापीठे या ठिकाणी येऊन एज्युकेशन हब होणार आहेत आणि याचा फायदा येथील प्रत्येक नागरिकाला होणार आहे. अन्नसुरक्षेपासून अनेक योजना यशस्वीपणे कार्यरत आहेत त्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे. ते द्रष्टे नेते आहेत, असे सांगून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ’तुमची आमची भाजप सर्वांची’ हा गजर पुन्हा दुमदुमणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना यशाच्या दिशेने नेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागील निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढून 78पैकी 51 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी निवडणूक कशी लढायची याची शिकवण दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शाह, देवेंद्रजींनी रवींद्रजींनी राज्याला ताकद दिली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नगर परिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत सर्वात जास्त नगराध्यक्ष, उमेदवार विजयी झाले. देवेंद्रजी सर्वसामान्यांचे नेतृत्व असून रवींद्रजींच्या नेतृत्वाखाली संघटन मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम होत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, ग्रामीण भागात विकासाचा झंझावात निर्माण झाला आहे.
पनवेल महापालिका निर्माणासाठी शेकापने विरोध केला, पण आपण सर्वांनी निर्धार केला आणि महापालिका होऊन प्रत्येक भागात, प्रभागात विकास सुरू झाला. 2017 साली जनतेने कौल दिला तो विश्वास सार्थ ठरवून विकासकामे झाली. केलेल्या कामाचा संदेश घेऊन मतदारांपुढे जाणार असून महापालिकेचा विकासाचा पुढील टप्पा अर्थात व्हिजनसुद्धा तयार आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी पक्षाचा सन्मान राखला. एबी फॉर्मसाठी धावणारे नाही, तर पक्षाने जबाबदारी दिलेले कार्यकर्ते होते. त्यामुळे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करत असून त्यांचा विश्वास महत्त्वाचा ठरला आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. त्याचप्रमाणे महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या मित्रपक्षांचे एकदिलाने सहकार्य मिळाले असल्याचे सांगून त्यांचेही त्यांनी आभार मानले.
मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. निवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले नितीन पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, सरचिटणीस चारुशीला घरत, प्रल्हाद केणी, राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊ आणि उत्कृष्ट सहकारी म्हणून परेश ठाकूर यांचा अभिमान : आमदार प्रशांत ठाकूर

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माझे बंधू परेश ठाकूर यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती आणि ती त्यांनी प्रत्यक्षात अमलातही आणली. कार्यकर्ता प्रथम ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, मात्र त्यांनी तो नम्रपणे नाकारत कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. निःस्वार्थ आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेमुळे भाऊ आणि उत्कृष्ट सहकारी म्हणून मला परेश ठाकूर यांचा मनापासून अभिमान आहे, अशा शब्दांत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply