कर्जत : प्रतिनिधी
अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या 1982-83 च्या दहावी इयत्तेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वांगणी येथील मोरे नर्सरीमध्ये पार पडला. यावेळी 39 वर्षानंतर शाळाच भरल्यासारखे वाटत होते. राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याची सुरूवात झाली. मेधा वैद्य, सुनील हरपुडे, स्वाती शिंदे, विनोद राणे, केदार देशक, अनुप मावळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. काळाच्या पडद्याआड गेलेल्या मित्रांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर मित्र – मैत्रिणींची मजेशीर ओळखपरेड झाली. 39 वर्षानंतर भेटलेल्या काही माजी विद्यार्थ्यांना ओळखण्याचा छानपैकी प्रयत्न झाला. मोरे नर्सरीच्या प्रशस्त प्रांगणात तसेच नदीच्या परिसराची भटकंती एकमेकांशी गप्पा, हशा, विनोद, चेष्टामस्करी करत किती वेळ झाली, हे कुणालाच कळले नाही. या सर्व क्षणांची आठवण रहावी म्हणून ड्रोन कॅमेरा सर्व क्षण टीपत होता. भोजनानंतर पुन्हा गप्पा रंगल्या, गाणी गाण्याची हौसही भागवून घेतली. गाण्यांच्या भेंड्या, हाऊजीचा खेळ झाला. सरते शेवटी दरवर्षी नक्की भेटायचं, तसेच सभासदांपैकी कोणाकडे अचानक अडचण उद्भवल्यास त्यासाठी एक ठराविक निधी कायमस्वरूपी जमा करणे याबाबत नक्कीच विचार करून अंमलात आणण्याचे ठरले. दिनेश जैन यांनी आभार प्रदर्शन केले.