Breaking News

नववर्ष, वीकेण्डला पालीत पर्यटकांचाही ओघ वाढला

रोजगाराला मिळाली चालना

पाली : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी शनिवारी व रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. तसेच सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे, लेण्या, स्तूप व अन्य पर्यटनस्थळी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. पाली नगरपंचायतीचे कर्मचारी मास्क न लावणार्‍या भाविकांकडून दंड वसूल करून मास्क घालण्याच्या सूचना देत होते.

भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदादेखील तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.

मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असल्याचे, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला झाला.

-राहुल मराठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply