लंडन : वृत्तसंस्था
इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघातून बाहेर करण्यात आले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) नियमितपणे घेतलेल्या उत्तेजक चाचणीत दुसर्यांदा दोषी आढळल्यामुळे ईसीबीचे संचालक अॅशले गाईल्स आणि निवड समितीने हा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी अॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या 15 जणांच्या प्राथमिक संघात निवड करण्यात आली होती.
या कारवाईमुळे हेल्सला आयर्लंडविरुद्धचा एकमेव एकदिवसीय सामना, पाकिस्तानविरुद्धचा एकमेव ट्वेन्टी-20 सामना आणि पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका, तसेच विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान गमवावे लागणार आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड केली जाणार असून, जेम्स विन्स याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वीच ब्रिस्टॉलमधील रस्त्यावर हाणामारी केल्याप्रकरणी याआधी हेल्सवर सहा सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हेल्सने 11 कसोटी, 70 एकदिवसीय आणि 60 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.