Wednesday , June 7 2023
Breaking News

‘झुक झुक गाडी’चा उपक्रम पनवेलसह रायगडात फोल

उशीराच्या दादर-सावंतवाडीवरील माहिती पाहणार कोण?

पनवेल : प्रतिनिधी

मध्य रात्रीच्या अंधारात पनवेलकरांना तर साखर झोपेत  दक्षिण  रायगडकरांना दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या अनेक विविध विकासकामांची माहिती व राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती तुतारी एक्स्प्रेसच्या (दादर-सावंतवाडी) माध्यमातून दिली जाणार आहे, मात्र साखर झोपेत आली आली झुक झुक गाडी…! स्वप्नांच्या दुनियेत स्टेशनवर जाऊ या, जाऊ या, सरकारच्या कामांची माहीती घेऊ या, घेऊ या असे म्हणायची वेळ रायगडमधील जनतेवर सरकारी अधिकार्‍यांमुळे आली आहे.

राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकार ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ या मोहिमेतून हा उपक्रम राबवीत आहे. यामध्ये राज्यात करण्यात आलेल्या विविध कामांचा उल्लेख रेल्वेच्या डब्यांवर  करण्यात आला आहे. दोन वर्षांत राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.

दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मिरज मार्गे धावणारी कोल्हापूर-मुंबई कोयना व कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा समावेश आहे. राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठी 1 फेब्रुवारी ते 1 मार्च 2022 दरम्यान एक महिना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

’आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ ही टॅग लाईन घेऊन  विविध लोकापयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यांवर अंकित करण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, मोफत सातबारा, ई-पीक पाहणी, यासह विविध योजनांचा येत समावेश आहे. राज्य सरकारकडून दादर-सावंतवाडी (तुतारी  एक्स्प्रेस) ह्या गाडीची निवड करण्यात आली आहे. तुतारी एक्स्प्रेस ही रात्री 1.10 वाजता पनवेल, 3.18 वाजता माणगाव, 3.35 वाजता वीर रेल्वेस्थानकावर येते, म्हणजेच पनवेलला मध्यरात्री तर माणगाव व वीर रेल्वेस्थानकावर पहाटे साखर झोपेत असताना येते.

या वेळी माणगाव व वीर या स्थानकावर किंवा गाडीच्या मार्गाच्या आजूबाजूला कोणी ही नसते. त्यामुळे ही माहिती नागरिकांपर्यंत कशी पोहचणार याचा विचार या गाडीची निवड करणार्या अधिकार्‍यांनी केलेला दिसत नाही. या गाडी ऐवजी दिवा-सावंतवाडी गाडीची निवड केली असती तर ही गाडी दोन्ही वेळा (येता-जाता) दिवसा उजेडी जाते. या गाडीला जास्त थांबे असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा उद्देश सफल झाला असता.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply