Breaking News

नारपोली ते रसायनी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ

आमदार महेश बालदी यांनी शक्य करून दाखवले

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोन-सावळे मार्गावरील उर्वरित नारपोली ते रसायनी टप्प्यातील काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याकडे तत्कालीन लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होताना निदर्शनास आले. त्यामुळे आमदार झाल्यानंतर महेश बालदी यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. तत्कालीन ठाकरे सरकारने याबाबत उदासीनता दाखविल्याने आमदार महेश बालदी यांनी निधीसाठी थेट केंद्राकडे मागणी केली.
कोन-सावळे रस्त्याच्या आजूबाजूला कंटेनर यार्डची संख्या वाढल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे असून कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी करीत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी 14 कोटी 65 लाख रुपयांचा निधी दिला.
पहिल्या टप्प्यात कोन ते नारपोली गावापर्यंत रस्ता काँक्रीटीकरणचे काम पूर्ण झाले. त्यानंतर उर्वरित नारपोली ते रसायनी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आमदार महेश बालदी यांनी तातडीने राज्य सरकारकडे मागणी तसेच पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने विद्यमान सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये, तर केंद्रीय रस्ते निधी अर्थात सीआरएफतर्फे मंजुरी दिली गेली. त्यानुसार नारपोली ते रसायनी या चार किमी अंतराच्या काँक्रीटीकरण कामासाठी राज्य सरकारच्या बजेट माध्यमातून 25 कोटी रुपये, तर केंद्रीय रस्ता निधीतून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होऊन वाहनचालक, प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आमदार महेश बालदी यांनी शक्य करून दाखवले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत त्यांचे आभार मानले जात आहे. हे काम दर्जेदार करण्याच्या सूचना आमदार महेश बालदी यांनी ठेकेदारांना केल्या आहेत.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply