Breaking News

पाणी कपात करण्यापेक्षा पाणी चोरी थांबवा; आमदार मंदाताई म्हात्रे नवी मुंबई महापालिकेकडे मागणी

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी

नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईमध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. सध्या पुनर्विकासाची कामेही सुरू झाली असून यापुढे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीची अनेक कामे सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत कामांना, प्रकल्पांना होणारा पाण्याचा वापर पाहता भविष्यात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबत पाणी चोरीच्या घटनादेखील वाढल्या असून त्या थांबवणे गरजेचे आहे, मात्र पाणी कपात करू नये, अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पाणी चोरी थांबवण्यासाठी आज जर  उपाययोजना करण्यात आली नाही तर भविष्यात नवी मुंबईकरांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण हे स्वतःच्या मालकीचे असले तरी नवी मुंबईकरांना आजही पूर्णपणे पाणी पुरवठा होत नाही. अशातच नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागवार एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या मालकीचे धरण असूनही नवी मुंबईकरांना अशा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. मोरबे धरणाची खोली व उंची वाढवल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा साठा होऊ शकेल. नवी मुंबईतील बहुतांश भाग हा समुद्र किनार्‍याने व्यापलेला असल्याने समुद्राच्या या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प सुरू केल्यास नवी मुंबईत भविष्यात येणार्‍या पाणी संकटावर मात करता येईल. याबाबत महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणीदेखील आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाणी गळती व पाणी चोरीच्या घटनाही उघडकीस येत आहेत, या सर्व बाबींचा तसेच नवी मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पास होणार्‍या पाणी पुरवठाबाबतचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त पाणी पुरवठा होणे ही काळाची गरज असून मोरबे धरणाची खोली-उंची वाढवणे व समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प राबविल्यास येणार्‍या पिढीला त्याचा फायदा होऊ शकणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळेल. या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाची खोली-उंची वाढवणे तसेच नवी मुंबईमध्ये समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी जल शुद्धीकरण प्रकल्प सुरु करावा, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एसटीपीचे पाणी पुरवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. हे स्वागतार्ह असून त्यामुळे मोरबेचे पिण्यायोग्य पाणी वाचणार आहे. मात्र त्यासोबत पाणी चोरीचे आव्हान पालिकेसमोर आहे. पाईपलाईनमधून थेट पाणी चोरी सुरू असून पालिकेने मोरबे धारणापासून तपासणी पथक तैनात करावे त्यांच्यामार्फत पाइपलाइन कुठे फुटली आहे वा कुठून चोरी होत आहे हे नियमित तपासावे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाचेल.

-आमदार मंदाताई म्हात्रे, बेलापूर

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply