खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे
मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या दबावापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) तीन दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले.
राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. या संदर्भात आराखडा आखण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी खासदार संभाजीराजेंची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहीत आहे, पण जेथे जेथे माझी गरज असेल तेथे मी पूर्ण सहकार्य करेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी या वेळी दिली.
दरम्यान, राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.