सिद्धांत म्हात्रेचे 10 बळी
अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात रायगड संघाने लातूर संघावर 31 धावांनी विजय निर्णायक विजय मिळवला. फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रे या सामन्यात 10 बळी घेतले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात रायगडने 192 धावा केल्या. लातूरने पहिल्या डावात 197 धावा करून पाच धावांची आघाडी घेतली. रायगडने दुसर्या डावात आक्रमक फलंदाजी करून 29.3 षटकांमध्ये नऊ बाद 181 या धावसंख्येवर डाव घोषित केला. लातूरला सामन्यात निर्णायक विजय मिळवण्यासाठी दुसर्या डावात 38 षटकांत 177 धावांचे आव्हान होते, मात्र लातूरचा दुसरा डाव 32.5 षटकांमध्ये 145 धावांमध्ये गुंडाळून रायगडने हा सामना 31 धावांनी जिंकला. रायगडच्या पहिल्या डावात स्वराज दळवी याने सर्वाधिक 50 धावा केल्या. तहा चिचकरने 46 धावा करून त्याला चांगली साथ दिली. सिद्धांत म्हात्रे याने नवव्या क्रमांकावर नाबाद 29 धावा केल्या. रायगडच्या सिद्धांतनेच लातूरच्या पहिल्या डावात 83 धावा देऊन सहा बळी घेतले. दुसर्या डावात तहा चिचकरने पाच चौकार व चार षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. स्वराज दळवी, अभिषेक खातू, रितेश तिवारी यांनीही आक्रमक फलंदाजी केली. लातूरला सामना जिंकण्यासाठी दुसर्या डावात 38षटकांत 177 धावा करायच्या होत्या, मात्र रायगडच्या भेदक गोलंदाजीसमोर लातूरचे फलंदाज टिकू शकले नाहीत. फिरकी गोलंदाज सिद्धांत म्हात्रेने सामन्यात 132 धावा देत 10 बळी घेतले. त्याला अभिषेक खातू (चार बळी), सिद्धार्थ म्हात्रे (तीन बळी) व मल्हार वंजारी (दोन बळी) यांनी चांगली साथ दिली. लातूरवरील विजयामुळे रायगड संघाने सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. दोन सामन्यांमध्ये पहिल्या डावात पिछाडीवर असतानादेखील रायगड संघाने विजय मिळवला. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व पदाधिकार्यांनी रायगड संघाचे अभिनंदन केले.