Breaking News

बागमळा खाडीत केला जातोय भराव

पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती

अलिबाग : प्रतिनिधी

निसर्गसौंदर्याने बहरलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव-चौल परिसरामधील बागमळा खाडीत मातीचा भराव करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. हे भरावाचे काम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील खाड्या भराव करून बजवून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.  रेवस बंदराजवळील 50 कोटींच्या भरावाच्या प्रकरणानंतर आता निसर्गसौंदर्याने बहरलेल्या नागाव-चौल परिसरातील बागमळा खाडी उद्योगपती हिरानंदानी यांच्या पर्यटन उद्योगासाठी मातीचा भराव करून बुजविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे हिरानंदानी यांच्याविरूध्द यापूर्वी कांदळवनाची तोड केल्याबद्दल तत्कालीन प्रांत शारदा पोवार यांनी अलिबाग कोर्टात  25 एप्रिल 2019 रोजी खटला दाखल केला आहे.

14 ते 16 मे या सलग तीन दिवस आलेल्या सरकारी  सुटीचा फायदा घेऊन बागमळा खाडीकिनारी हा बेकायदेशीर भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची भीती आहे. त्यामुळे भरावाचे काम थांबवावे तसेच जिल्हा किनारा आपत्ती प्राधिकरणा मार्फत पंचनामा करून कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ही घटना कोकण आयुक्त अध्यक्ष असलेल्या कांदळवन संरक्षण समितीने मुंबई उच्च न्यायालयालाही तातडीने कळवावी. कारण हा न्यायालयाचा अवमान आहे. हिरानंदानी सँड  प्रकल्प तातडीने थांबवावा व सर्व  परवानग्या रद्द कराव्यात, संबंधित  कंत्राटदारावरही गुन्हा  दाखल करून सखोल चौकशी करावी अशा मागण्या ग्रामस्थांतर्फे करण्यात आल्या आहेत.

बागामाळा खाडीत पुन्हा मातीभराव केल्याने पावसाळ्याती पाणी गावात पाणी शिरण्याची भीती आहे. त्यामुळे भरावाचे काम तात्काळ थांबवून संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संजय सावंत यांनी अलिबाग उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply