सुरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम; ठाकरे सरकार धोक्यात
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरत येथे एका हॉटेलमध्ये गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या संपर्कात नाहीयेत. 2019मध्ये मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप युतीमध्ये मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली, मात्र तेव्हापासूनच या सरकारमधील घटक पक्षांमध्ये वेळोवळी असमन्वय दिसून आला आहे. आता शिवसेनेत फूट पडली आहे.
एकनाथ शिंदेसोबत सुमारे 35 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे हे मागील बर्याच काळापासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी बंड करणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत शिंदे यांनी काही अटी ठेवल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी तोडून भाजपशी युती करावी तसेच भाजपसोबत शिवसेनेने सरकार स्थापन करण्याची मागणी शिंदे यांनी केली असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी काही आमदार शिंदे गटात जाणार?
मुंबई ः एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणखी चार ते पाच आमदार हे शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. हे आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप पुढे आलेले नाही, परंतु शिंदे यांच्यासोबत हॉटेलमध्ये 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यात आणखी चार ते पाच आमदार आल्यास ही संख्या 40पर्यंत जाऊ शकते. शिवसेनेतील मोठे नेते मानले जाणारे शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती, पण पक्षनेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.