जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात
कळंबोली : बातमीदार
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4 मधील काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काम सुरू केले आहे. सोसायटीमधील नागरिकांना मोठ्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कळंबोली वसाहतीतील सेक्टर 4 मधील गुरू, गुरू प्रेम, अमरदीप व अन्य सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा गेल्या अनेक वर्षापासून होत होता. याबाबतची तक्रार या सोसायट्यांनी सिडको व महापालिकेकडे केली होती, तसेच येथील कर्तव्यदक्ष नगरसेवक बबन मुकादम यांच्याकडे ही या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. त्याबाबतचा पाठपुरावा नगरसेवक बबन मुकादम यांनी महापालिका व सिडकोकडे केल्याने अखेर येथे 145 मीटर लांबीची व सहा इंच व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू केले आहे. या जलवाहिनीला अंदाजित खर्च चार लाख रुपये झाला आहे.
मोठ्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मोठ्या दाबाने पाणी मिळणार असल्याने रहिवाशांनी नगरसेवक बबन मुकादम यांना धन्यवाद दिले आहेत.