Breaking News

आमच्या संयमाचा अंत पाहू नका

गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

पुणे ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. 2) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा सूचक इशाराच उदय सामंत यांनी शिवसेनेला दिला आहे.

कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते. त्यावेळीच हा हल्ला झाला, या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला. सामंत यांनी ट्विटरबरोबरच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला आहे.

सामंत यांनी, ट्विटरवरून गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई-वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ याला उत्तर आहे. अंत पाहू नका, असे ट्विट केले आहे. या हल्ल्यानंतर आपण पुण्यातील पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. माझी, माझ्या कारच्या चालकाची आणि खासगी सचिवाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

सामंत यांनी या वेळी एखाद्याचा विचार पटला नाही, तर ठार मारण्यासारखी टोकाची भूमिका घेणे काही योग्य नाही, असेही म्हटले, तसेच या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहर्‍यामागे काय चाललेय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला. त्या दिवशी दुपारीच मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमात कोणीही काहीही बोलले तरी आपण विकासाच्या कामातून उत्तर द्यावे असे म्हटले होते. एकीकडे मुख्यमंत्री अशी भूमिका मांडत असताना दुसरीकडे त्याच दिवशी माझ्यावर हल्ला झाला, असे म्हणत सामंत यांनी टीका केली.

हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचे काम कोणी करीत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, तसेच आमदारांची सुरक्षा वाढवणार असल्याचा निर्णय बुधवारी (दि. 3) झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना या संदर्भात आदेश देण्यात आले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply