मुंबई ः प्रतिनिधी
सिम स्वॅप करून बँक खात्यातून परस्पर पाच लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार साकीनाका येथे उघडकीस आला आहे. स्किमरने डेबिट कार्ड डेटा चोरी करून हे पैसे काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पैसे काढल्याचा एकही संदेश या खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर आला नाही. त्यामुळे सिम स्वॅप करूनच ही फसवणूक करण्यात आल्याची शक्यता असून या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका येथे सायराबानो खान (60) आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे आयसीआयसीआय बँकेच्या चांदिवली शाखेत बचत खाते असून या खात्याचा वापर त्यांचा मुलगा संगणक व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारासाठी करीत होता. गेल्या महिन्यात त्यांचा मुलगा नागपाडा येथील एका नातेवाइकाच्या लग्नाला गेला होता. पैशांची गरज असल्याने त्याने या नातेवाइकाला 50 हजार रुपये काढून दिले. यानंतर त्यांच्या बँक खात्यात साडेसहा लाख रुपये शिल्लक होते. संगणक व्यवसायासाठी सायराबानो यांच्या मुलाने काही जणांना चेक दिले आणि काही रक्कम त्यांच्याकडे जमाही झाली. त्यातच एक लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याची तक्रार एका व्यावसायिकाने सायराबानो यांच्याकडे केली. पैसे असतानाही चेक बाऊन्स कसा झाला हे पाहण्यासाठी सायराबानो व त्यांचा मुलगा बँकेत गेले असता खात्याचा तपशील पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
त्यांच्या खात्यामधून 10 हजार रुपये 19 वेळा, 20 हजार रुपये 13 वेळा, तर 50 हजारांची रक्कम एकदा काढण्यात आली होती. वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून ही रक्कम काढण्यात आली होती. काढण्यात आलेल्या एकाही रकमेचा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
-असे होते सिम स्वॅपबँक खात्याला जोडण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकाचे सिमकार्ड डुप्लिकेट कागदपत्रांचा वापर करून घेतले जाते. हे सिमकार्ड सुरू होताच मूळ ग्राहकाचे सिमकार्ड काही वेळासाठी हॅक केले जाते, तसेच ई-मेलद्वारे किंवा इतर मार्गाने बोगस पत्रव्यवहार करून पत्ता तसेच मोबाइल क्रमांक बदलून घेतला जातो. यामुळे बँक खात्यामध्ये कोणताही व्यवहार झाला तरी त्याचे संदेश मूळ ग्राहकाच्या मोबाइलवर येत नाहीत.
RamPrahar – The Panvel Daily Paper