पेण : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त शासनाने नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा‘ संच 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. पेण तालुक्यातील आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ बोरगाव येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आनंदाचा शिधामुळे गोरगरिबांची दिवाळी गोड होईल, असे अनेक चांगले निर्णय शिंदे, फडणवीस सरकारने घेतले आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, संजय पाटील, रवि झिंजे, बोरगावचे माजी सरपंच नाना महाडिक, विकी बोरेकर, पेणचे प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार, पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांच्यासह शिधापत्रिकाधारक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 83 हजार 251 शिधा पत्रिकाधारक व प्राधान्य कुटूंब योजनेतील तीन लाख 64 हजार 824 शिधापत्रिकाधारक अशा एकूण चार लाख 48 हजार 75 तर पेण तालुक्यामधील 41 हजार 404 ग्राहकांना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त फक्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
-विठ्ठल इनामदार, प्रांत अधिकारी, पेण
RamPrahar – The Panvel Daily Paper