Breaking News

विश्वचषक दोन पावलांवर…

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी 2007मध्ये याच झटपट प्रकारातील पहिल्यावहिल्या चषकावर टीम इंडियाने आपले नाव कोरले होते. पाठोपाठ 2011मध्ये एकदिवसीय करंडक दुसर्‍यांदा जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. त्यानंतर एक तपाचा कालावधी लोटला, पण विश्वविजेतेपदाचा मान आपल्याला मिळविता आला नाही. अखेर ही सुवर्णसंधी आली असून भारत टी-20 विश्वचषकही दुसर्‍यांदा उंचविण्याची किमया साधणार का याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघ सध्या भरात आहे. स्टार फलंदाज विराट कोहली तर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुपर-12 फेरीतील आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कोहलीने खेळलेली ’विराट’ खेळी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे. त्यानंतरदेखील या ’रनमशिन’मधून पूर्वीसारखा धावांचा ओघ सुरूच आहे. आणखी एका खेळाडूने या विश्वचषकात लक्ष वेधून घेतले आहे तो म्हणजे सूर्यकुमार यादव. या युवा आणि प्रतिभावंत खेळाडूची फलंदाजी पाहिल्यावर बेधडक वीरेंद्र सेहवागची आठवण येते. वीरू असाच जगातील कोणत्याही गोलंदाजावर, कोणत्याही मैदानावर बरसायचा. फरक फक्त एवढाच आहे की वीरू डावाच्या सुरुवातीला फलंदाजी करीत असे आणि सूर्यकुमार मधल्या फळीत. सुरुवातीच्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षणाला मर्यादा असल्याने त्याचा फायदा फलंदाजाला होत असतो, पण चौथ्या क्रमांकावर खेळायला येऊन स्फोटक फलंदाजी करणे सोपे काम नाही, परंतु ’सूर्या’ ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्टीवर ऐन पावसातही सातत्याने ’तळपतोय’. केएल राहुललाही फॉर्म गवसलाय, मात्र कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा अजूनही चाचपडतोय. त्याने जबाबदारीने खेळले पाहिजे. म्हणजे संघाला चांगली सुरुवात मिळू शकते. फिनिशर दिनेश कार्तिकदेखील विशेष काही करू शकलेला नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या जागी युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले, मात्र तो स्वस्तात बाद झाला. अर्थात एका सामन्यावरून खेळाडूच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येत नाही, पण विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत एक सामना खेळायला मिळणेसुद्धा मोठी संधी असते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये या दोघांपैकी कुणाची निवड करायची हा प्रश्न कर्णधारापुढे असेल. अष्टपैलू रवींद्र जडेजाची या वेळी आठवण येते. तो गोलंदाजीबरोबरच चांगली फटकेबाजीही करतो, मात्र प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहप्रमाणेच तोही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अक्षर पटेलला जडेजाचा भावी वारसदार म्हणून पाहिले जात आहे, पण यासाठी त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल.
गोलंदाजी ही भारतासाठी नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. अलिकडच्या काळात त्यात काही प्रमाणात सुधारणा झालेली दिसून येते, मात्र आपल्याकडे हुकमी गोलंदाज नाही हे मान्यच करावे लागेल. शिवाय टी-20मध्ये भल्या भल्या गोलंदाजांची पिटाई होते हे मानले तरी निदान प्रमुख गोलंदाजांनी अनुभव पणास लावून धावांची खैरात टाळली पाहिजे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पावसाआधी आपल्या गोलंदाजांची काय अवस्था झाली होती. पावसानंतर मात्र चित्र बदलले. याचाच अर्थ सध्याच्या गोलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे. फक्त त्यांनी कसून गोलंदाजी करणे आवश्यक आहे. विशेषकरून मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन यांच्याकडून अपेक्षा आहेत. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, पण त्यालाही सुधारण्यास खूप वाव आहे.
भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचे आजवरचे प्रदर्शन उत्तम राहिले आहे, पण आताचा इंग्लिश संघ आक्रमक दिसतो. त्यामुळे भारतालाही आपली कामगिरी उंचवावी लागेल. काही वेळा असे पाहण्यात आले आहे की आपला संघ आधी दमदार कामगिरी करतो आणि नंतर महत्त्वाच्या फेर्‍यांमध्ये मात्र कच खातो. त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. इथून पुढे छोटीशी चूकदेखील महागात पडू शकते. 10 नोव्हेंबर रोजी होणारा हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. तत्पूर्वी 9 तारखेला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील एक संघ अंतिम फेरीत दाखल झालेला असेल. सरतेशेवटी दोन संघांमध्ये 13 नोव्हेंबरला महालढत होऊन विश्वविजेता कोण याचे उत्तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

-समाधान पाटील, पनवेल

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply