पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सुधागड ः रामप्रहर वृत्त
पाली शहरातील कित्येक टन कचरा येथील टेंबी वसाहतीजवळील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो, मात्र येथे संरक्षक भिंत नसल्याने हा कचरा मुख्य रस्त्यावर येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपचायतीने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.
डम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला शिक्षक व इतर वसाहती आहेत. आयटीआय व विद्युत महावितरण सबस्टेशन आहे. शिवाय गृहसंकुल इमारतीसुद्धा आहेत. मढाळी व शिळोशी गावांना जाण्याचा हा मुख्य रस्ता आहे. डम्पिंग ग्राऊंडला संरक्षक भिंत नसल्याने कचरा रस्त्यावर आला आहे. घाण व दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पाली ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अजूनही घनकचरा व्यवस्थापनचा
प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
संरक्षक भिंत नसल्याने मोकाट गुरे, कुत्रे तेथे येऊन प्लास्टिकमधील अन्नपदार्थ कचर्यासह खातात, त्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात येत असून अनेक जनावरेदेखील दगावली आहेत. येथील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच शास्त्रीय पद्धत वापरली जात नाही. हा कचरा थेट जाळला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा
प्लास्टिकचा पुनर्वापर व प्रक्रिया व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5आर मुंबई, रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेस समिती व प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा आदर्श पाली नगरपंचायतीनेही घेऊन प्लास्टिकचे पुनर्वापर करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
नगरपंचायत कर्मचारी कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये न टाकता रस्त्याच्या बाजूला टाकतात. हा कचरा रस्त्यावर आल्याने दुर्गंधी व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाली नगरपंचायतीने या डम्पिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत घालावी जेणेकरून जनावरे आत जाणार नाहीत आणि कचरासुद्धा बाहेर येणार नाही.
-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली
डम्पिंग ग्राऊंड व त्या बाहेर येणार्या कचर्यासंदर्भात लवकरच योग्य उपयोजना करण्यात येईल. याबाबत कर्मचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत.
-आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली