महाड : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने महाड मध्ये राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी (दि. 25) महाडमध्ये झाले. या वेळी बोलताना संमेलनाध्यक्ष सुरेश मेहता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इंग्रजी भाषा काळाची गरज असली तरी इंग्रजी अनिवार्य असू नये असे सांगून मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये, असे आवाहन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाड शाखेकडून राजमाता जिजाऊ साहित्य संम्मेलनाचे आयोजन दशनेमा सभागृह येथे करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले. या वेळी आमदार भरत गोगावले, संमेलनाचे अध्यक्ष सुरेश मेहता, कोकण प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अलका नाईक, डॉ.अ.ना.रसनकुटे, फुलचंद नागटिळक, स्वागताध्यक्ष मंगल गांधी, सचिव रिचा गांधी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, विशाल मोरे आदी उपस्थित होते. राजमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन आणि पाहुण्यांचे स्वागत करून या साहित्य संमेलनास सुरुवात झाली. या वेळीसर्वच मान्यवरांनी देशातील समस्या मांडण्याचा प्रयत्न साहित्यातून झाला पाहिजे असे मत व्यक्त करत आज सर्वसामान्य माणूस ज्या प्रकारे जीवन जगत आहे त्याचे वर्णन साहित्यातून अनेकदा येते मात्र त्याला न्याय देण्याचे काम देखील साहित्यातून झाले पाहिजे असे मत सुधीर शेठ, डॉ. अ. ना. रसनकुटे, फुलचंद नागटिळक यांनी मांडले. तर डॉ. अलका नाईक यांनीदेखील साहित्यातून सामान्य माणसाचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम साहित्यिकाने केले पाहिजे असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातदेखील सुरेश मेहता यांनी सद्या नवयुवक साहित्यापासून दूर जात असून त्याला पुन्हा यामध्ये ओढणे हा आपल्यासमोर प्रश्न असल्याचे सांगून इंग्रजी भाषेचा वापर काळाची गरज बनली असली तरी याकरिता मराठी भाषेचा बळी दिला जाऊ नये असे सांगून देशातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरीब, वंचित, शोषित, पिडीत यांसारख्या देशाचा कणा असलेल्या लोकांचा जीवनपट साहित्यातून उमटला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित कवींनी आपल्या कविता देखील सादर केल्या. हे संमेलन करण्यासाठी मंगल गांधी, नेत्रा मेहता, संगीता कांबळे, नेहा तलाठी, निलांबरी घोलप, त्रिवेणी मराठे, आदींनी मोलाचे सहकार्य केले.