लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 11) खांदा कॉलनी येथे आयोजित समारंभात काढले.
दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय रौप्य वर्ष महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या दिवशी हा सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर गरीब परिस्थितीतून सातारा येथे कर्मवीरांच्या भूमीत शिकले. त्यांना कर्मवीर अण्णांचा सहवास लाभला आणि त्यांचे दातृत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अंगिकारले. देणार्याने देत रहावे आणि घेणार्याने घेत राहावे म्हणजे दान करण्याची वृत्ती घेत जावे आणि ती देण्याची वृत्ती आहे म्हणूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दातृत्वाचे धाडस होत आहे असे सांगतानाच हे सीकेटी महाविद्यालय विद्यापीठ होण्याच्या मार्गावर असल्याचे अधोरेखित केले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे कार्यकारिणी मंडळ सदस्य तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव व्ही. एस. शिवणकर, पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष जयंत पगडे आदी उपस्थित होते.