Breaking News

पनवेलमध्ये पाणीटंचाईचे नियोजन तयार

तालुक्याचा संभाव्य कृती आराखडा सादर

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्याचा 2022 ते 2023 पर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पनवेलमध्ये पाणीटंचाई झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात आले आहे. यात 49 गावे टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहेत. तर 32 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी 24 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिल महिना संपत आला आहे. उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे काही प्रमाणात सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत. सार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे व दुरुस्त करण्यासाठी साडेचार लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सांगटोली, नानोशी, बेलवाडी, गराडा, उमरोली, खैरवाडी, घेराकिल्ला माणिकगड येथील विहीर दुरुस्ती करणे तर खैरवाडी येथे गाळ काढणेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी 49 गावांसाठी 36 लाख 75 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. टँकरसाठी माड भुवन (आपटा) कसळखंडमधील पाच गावे, वारदोली (हालटेप) येथील प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. चावणे प्रादेशिक योजनेची पाईपलाईन दुरुस्त करणे, त्यांचा गाळ काढणे, पंप दुरुस्त करणे व एअर बॉल सलुईस वॉल बसवण्यासाठी पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित आहे. विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीसाठी शिरवली, कोडप, वांगणी साठी अंदाजे दीड लाखांचा खर्च आहे. 32 गावांमध्ये विंधन विहिरींसाठी 24 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव फेब्रुवारी 2023 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. 32 गावांमध्ये विंधण विहीरी खोदण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती

बोनशेत, कोप्रोली, विहिघर, पाटनोली, मोसारे, नानोशी, बेलवाडी, गराडा, शिरढोण, शिरढोण पाडा, शिवाजीनगर, फणसवाडी, अष्टे, अरिवली, ताराटेप, हालटेप, घेरावाडी आपटा, कोरळवाडी आपटा, माड भुवन, पोयंजे आदिवासी वाडी, पाली कातकरवाडी, बौद्ध-भटीचीवाडी वावंजे, पालीदेवद, शिरोत्तर रायचूर, आकुर्ली, कुंभ टेकडी, खालची धामणी, हौशाची वाडी, कोंडीची वाडी, टावरवाडी, वाघिवली, आदई येथे विंधण विहिरींसाठी प्रस्ताव बनवण्यात आले असून तो अलिबाग येथे पाठविण्यात आला आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply