Breaking News

कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे स्मरण ठेवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आजची तरुण पिढी स्वतःला मिलेनिअर म्हणवून घेते. या तरुण पिढीला देशाचा विकास करायचा आहे. देशाचा विकास करताना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आणि कर्तृत्व सिद्ध करताना इतिहासाचे विस्मरण होऊ नये, असे सांगून आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या खुणा सतत तेवत ठेवण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम राबवला जात आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी शासन निर्देशानुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 9) क्रांती दिनाच्या निमित्ताने पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानात झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, बाबासाहेब राजळे, संतोष वारूळे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, माजी नगरसेवक-नगरसेविका, महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिकाचे उत्तराधिकारी, पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन समारंभ पनवेल महापालिकेमार्फत साजरा केला जाणार आहे. शासन निर्देशानुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये क्रांती दिनाच्या निमित्ताने तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानात घेण्यात आला. यामध्ये माजी सैनिक रावसाहेब आभाळे, स्वातंत्र्यसैनिकांचे उत्तराधिकारी वसंत खरे, अनिल आचार्य, यतिंद्रनाथ ठाकूर, अनिल निकम, प्रमोद पानसरे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे व सूत्रसंचालन प्रवीण मोहकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी मानले.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply