पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत. येत्या पाच वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय नैसर्गिक वायु, पर्यटन आणि पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी (दि. 18) नवीन पनवेल येथे केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ना. सुरेश गोपी बोलत होते. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पनवेल मतदारसंघात राहणार्या सर्व मल्ल्याळी आणि दक्षिण भारतीय बांधवांनी आपले मत हे त्यांना द्यावे, असे आवाहन केले.
ना. सुरेश गोपी यांनी पुढे बोलताना सांगितले की, भाजप आणि सहकारी पक्षांची विचारधारा सामाजिक विकासाची आहे. त्या अनुषंगाने देशात आणि राज्यात काम होत आहे. कितीही कामे केली तरी विरोधक फक्त समाजात विरोधच पसरवत असतात. त्यामुळे त्यांची मानसिकता ही देशहिताची कधीच राहिली नाही. आपण काम करत रहायचे हे आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर काम करत असतात. त्यामुळेच सर्व समाजातील लोकं त्यांच्याशी जोडली गेली आहेत. शुद्ध विचाराने काम करत असल्याने त्यांना जनतेचा पाठिंबाही मिळत आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम होत आहे. त्याच अनुषंगाने देशात मोठ्या प्रमाणात झपाट्याने विकास होत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, यु-टर्न घेत सर्व विकासकामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात केले. राज्याच्या विकासापेक्षा त्यांनी स्वतःच्या विकासालाच प्राधान्य दिले. त्यामुळे जनतेला विकासाच्या दिशेने नेऊन त्यांच्या नेहमी पाठिशी असणार्या महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणा तसेच येत्या 20 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, माजी नगरसेवक समीर ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, भाजप दक्षिण भारतीय सेलचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक रमेश नायर, उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजक जयेश नांबियार, महिला मोर्चा उपाध्यक्ष यमुना प्रकाशन, सुषमा नायर, लीना प्रेमचंद, माया नायर, विद्या श्रीकुमार, जय प्रकाश, रामकृष्णन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …