Breaking News

जमीर 50 वर्ष; तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी!

साहिर लुधियानवी यांच्या चित्रपट गीतांमधील आशयाची, कसदारपणाची कायमच चर्चा होत असते. चित्रपटासाठीच्या गीतलेखनात पूर्वीच्या काळातील अनेकांनी उत्तम दर्जा व सातत्य कायम ठेवले. याच कारण त्यांची अफाट प्रतिभा, हिंदी व उर्दू भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, गीत संगीताची जाण असलेले पटकथाकार, निर्माते, दिग्दर्शक व कलाकार, त्या काळात प्रत्येक गाण्यावर होत असलेली दीर्घकाळ सिटींग, त्या गाण्यांचे संगीताच्या ताफ्यासह होणारे पार्श्वगायन आणि त्या गाण्यांचे रूपेरी पडद्यावरील सादरीकरण अशी त्यामागची अनेक कारणे आहेत.
बी.आर. फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेचा बी.आर. चोप्रा निर्मित व रवि चोप्रा दिग्दर्शित ‘जमीर’ची साहिर लुधियानवी यांची गाणी आजही पटकन ओठांवर येतात हे विशेषच. संगीत सपन चक्रवर्ती यांचे आहे. पन्नास वर्षांनंतरही जमीर म्हटलं की, त्यातील गाणी पटकन आठवतात. जिंदगी हसने गाने के लिए है दो पल (पार्श्वगायक किशोरकुमार), तुम भी चलो हम भी चले (किशोरकुमार व आशा भोसले), फुलो के देरे है (किशोरकुमार), बडे दिनों मे खुशी का दिन आया (महेंद्र कपूर) ही जमीरची गाणी सुरेल व सुरेख. याचा अर्थ त्या चित्रपटात पाहण्यासारखे फार काही नव्हते का? जमीर मुंबईत रिलीज झाला 21 मार्च 1975 रोजी. (मेन थिएटर नाझ) त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.
1975 हे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम व क्रीडा क्षेत्रासाठी खूपच महत्त्वाचे वर्ष. जागतिक क्रिकेटमधील पहिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा याच वर्षी इंग्लंडमध्ये पार पडली.
सिनेमाच्या जगात डोकावायचे, तर 1975 साली 10 जानेवारीला पुणे शहरात रामदास फुटाणे निर्मित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ प्रदर्शित झाला. मुंबईत 24 जानेवारीला गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’, 14 फेब्रुवारीला गुलजार दिग्दर्शित ’आंधी’ (याच दिवशी मुंबईत ‘सामना’ आला), 7 मार्चला राज खोसला दिग्दर्शित ‘प्रेम कहानी’ असे करत करत 21 मार्च रोजी ‘जमीर’ आणि शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमानुष’ (मिनर्व्हात मॅटीनी शोला) प्रदर्शित झाले.
बी.आर. चोप्रा हे चित्रपटसृष्टीतील बरेच मोठे प्रस्थ. स्वतः चोप्रासाहेबांनी दिग्दर्शित केलेल्या अफसाना, एक ही रास्ता, नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराज, धुंद अशा चित्रपटांतून विविधता साकारली. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘दास्तान’ रसिकांनी नाकारला. नाउमेद न होता बी.आर. चोप्रा यांनी पती पत्नी और वो, कर्म, इन्साफ का तराजू, तवायफ इत्यादी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांचे बंधू यश चोप्रा यांचीही बी.आर. फिल्ममध्येच जडणघडण व वाढ झाली. धुल का फूल, धरमपुत्र, वक्त, आदमी और इन्सान, इत्तेफाक यानंतर यश चोप्रा यांनी आपल्या भावाच्या सावलीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्वतःची यशराज फिल्म ही निर्मिती संस्था स्थापन करून ‘दाग’ (1973) पडद्यावर आणून आपली यशस्वी घोडदौड पुढे नेली. याच काळात बी.आर. चोप्रा यांचा मुलगा रवि चोप्रा याने चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. तोपर्यंत त्याने आपल्या पित्याच्या दिग्दर्शनात दास्तान व धुंद या तर काका यश चोप्रांकडे इत्तेफाकच्या वेळेस सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी केली होती. ही संधी घरातूनच असली तरी महत्त्वाची होती.
‘जमीर’ची गोष्ट ओ हेन्री याच्या अ डबल डाईड डिसिव्हर या लघुकथेवर आधारित असल्याचा एक संदर्भ आहे. यावरूनच राज खोसला दिग्दर्शित बम्बई का बाबू (देव आनंद व सुचित्रा सेन) होता.
‘जमीर’च्या श्रेयनामावलीत पटकथा स्टोरी डिपार्टमेंट असं म्हटलयं याचे मला कायमच कुतूहल. साठच्या दशकातील अनेक चित्रपटांचे लेखक म्हणून कथा विभाग (स्टोरी डिपार्टमेंट) असे वाचायला मिळते. या विभागात किती लेखनिक असतात, ते कागदावर लिहितात की टाईप रायटर वापरतात, त्यांचे काम कसे चालते, त्यांनादेखील कामाचे तास असतात का, अकाऊंट्स विभागाप्रमाणेच हा भाग असतो काय? असे खूप प्रश्न मनात असतात हो. मी मीडियात आल्यावर कोणत्याही निर्मिती संस्थेच्या कार्यालयात गेल्यावर उगाच इकडेतिकडे नजर टाकून स्टोरी डिपार्टमेंट दिसतेय का पहायचो आणि त्यात माझं काही चुकत होते का सांगा.
याच कथा विभागाने ‘जमीर’मध्ये काय दाखवलं? चित्रपट सुरू होताच पडद्यावर बंगलोर येथील अतिशय हिरवागार स्टड फार्महाऊसवर घोडे धावताना दिसताहेत आणि त्यातला एक घोडा बेशिस्तपणे वागतोय, तो उधळलाय, ते या स्टड फार्महाऊसचे मालक महाराज सिंग (शम्मी कपूर) पाहतात आणि आपण त्या घोड्यावर स्वार होत त्याला शिस्त लावण्याचे पाऊल टाकतात व त्यात ते यशस्वी ठरतात. महाराज सिंग आपली पत्नी (इंद्राणी मुखर्जी), मुलगा चिंपू व मुलगी स्मिता यांच्यासह या स्टड फार्महाऊसवर राहताहेत. त्यांच्याकडे रेसमध्ये धावणारे घोडे आहेत. अशातच एकदा डाकू मानसिंग (मदन पुरी) आपल्या टोळीसह या फार्महाऊसवर दरोडा टाकतात. त्यात महाराज सिंग यांच्याकडून मान सिंगचा मुलगा दुर्दैवाने मारला जातो म्हणून क्रोधित झालेला डाकू मानसिंग महाराज सिंगच्या मुलालाच पळवून नेतो. या धक्कादायक गोष्टीने महाराज सिंग व रुक्मिणी हवालदिल होतात.
काही वर्ष जातात आणि एके दिवशी फार्महाऊसची व्यवस्था पाहणारे रामू (रमेश देव) बादल (अमिताभ बच्चन) या युवकाला महाराज सिंगकडे घेऊन येत सांगतात, हाच तुमचा मानसिंगने पळवून नेलेला मुलगा. महाराज सिंग त्याला स्वीकारतात, पण त्यावर त्यांचा विश्वास नसल्याने ते आपली पत्नी व आता वयात आलेल्या मुलीला (सायरा बानू) ही गोष्ट सांगत नाहीत. बादल त्यांच्या मुलीच्या प्रेमात पडतो. खरंतर तो एक जेलमधून शिक्षा भोगून बाहेर पडलेला गुन्हेगार असतो. मानसिंगने पळवून नेलेला मुलगा सूरज (विनोद खन्ना) महाराज सिंगवर हल्ला करतो तेव्हा बादल त्यांना सत्य काय आहे ते सांगतो, आपका असली बेटा सूरज है (मानसिंगने त्याचे नाव बदललेले असते).
आज ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट पाहत असलेल्या डिजिटल पिढीला या स्टोरीत फारसा दम वाटणार नाही. लहानपणी हिरो हरवतो वा पळवून नेला जातो आणि पिक्चरच्या क्लायमॅक्सला पिता व पुत्र (अथवा दोन भाऊ, कधी तीन भाऊ) भेटतात ही आज कदाचित भाकडकथा वाटेल, पण पन्नास वर्षांपूर्वी मसालेदार मनोरंजक पिक्चर्सचा हा हुकमी फंडा होता. यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ (1965)मध्ये ते पेरले आणि पिक्चरच्या ज्युबिली हिटने ते उगवले. त्या फॉर्मुल्याला वजन दिले ते पटकथाकार सलिम जावेद यांनी (यादों की बारात, हाथ की सफाई बघा) आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी (अमर अकबर अ‍ॅन्थनी). त्या काळातील सुपरहिट फॉर्मुला. जमीरमध्ये बाप बेटा अखेरीस भेटतात. पिक्चर खतम, पण इम्पॅक्ट फार नाही. तोच तर महत्त्वाचा. फर्स्ट शोपासूनच पब्लिक कौल ठीक है पिक्चर असा. (त्या काळात मेन थिएटरमधील फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट एक बॅरोमीटर असे. अतिशय हुकमी व विश्वासार्ह. आजच्यासारखे अमूक अमूक पिक्चरने आज किती कोटी कमावले, उद्या किती असे आकड्यांचे खेळ नसत.)
पिक्चर आस्ते कदम चालत राहिला तो त्याच्यातील गीत संगीताने. त्याचे श्रेय गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार सपन चक्रवर्ती, पार्श्वगायक आशा भोसले, किशोरकुमार व महेन्द्र कपूर यांना! तुम भी चले…
काय गंमत बघा, सुबोध मुखर्जी दिग्दर्शित ‘जंगली’ (1961)मधून शम्मी कपूरची नायिका म्हणून चित्रपटसृष्टीत आलेली सायरा बानू या चित्रपटात त्याची मुलगी होती. (चौदा वर्षांत नात्यात बदल) शम्मी कपूरने आपली उछलकूद नायक म्हणून करियर उताराला लागताच थांबणे पसंत केले. वाढते वय स्वीकारले. चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत इर्माला ठूस या इंग्लिश चित्रपटावरून ‘मनोरंजन’ (1974) केला (काही वर्षानंतर ‘बंडलबाज’ दिग्दर्शित केला. दोन्ही फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शन हे आपले क्षेत्र नाही हे वेळीच स्वीकारले.) दाढीधारी रूपात तो चित्रपटसृष्टीत वावरत असतानाच फिरोझ खानने त्याला धर्मात्मा मधील आपल्या पित्याच्या भूमिकेची ऑफर देताच तो खवळला. गॉसिप्स मॅगझिन्सना खाद्य मिळाले.
‘जमीर’चे छायाचित्रण धरम चोप्रा यांचे, तर संकलन प्राण मेहरा यांचे. ‘जमीर’नंतर रवि चोप्रा याने तुम्हारी कसम, द बर्निंग ट्रेन, आज की आवाज, बागबान, बाबूल इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष उल्लेखनीय गोष्ट महाभारत ही मालिका. बी.आर. फिल्मचा हा सर्वोच्च बिंदू.
‘बागबान’च्या चित्रनगरीतील मुहूर्ताला चोप्रा पिता व पुत्र यांना एकत्र पाहण्याचा/अनुभवण्याचा योग आला. हा चित्रपट बी.आर. चोप्रा यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते ते रवि चोप्रा यांनी रूपेरी पडद्यावर आणले… ‘जमीर’ला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना हा खास फोकस.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply