कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 46वा स्थापना दिन रविवारी (दि. 6) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
1980मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भाजपचे पूर्वीचे नाव जनसंघ होतो, जो 1977मध्ये पक्षात विलीन झाला. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष बघता बघता केवळ देशच नाही तर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. पक्ष स्थापना दिनाच्या अनुषंगाने राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून संबोधित केले. पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागातील तोंडरे येथे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी खारघर कार्यालयात, पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर व शहर अध्यक्ष अनिल भगत, तर तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे त्या त्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन संवादाचा लाभ घेतला.
आज भारतीय राजकारणात भाजप केंद्रस्थानी आहे. एकेकाळी ज्या भाजपला राजकीय परिघाबाहेर ठेवण्यासाठी विरोधकांनी आटापिटा केला, त्याच भाजपने सिद्ध केलेल्या विषयसूचीवर देश प्रगती करीत आहे. देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी दूरदृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळेच भाजप आणि सर्वसामान्य माणूस यांचे नाते घट्ट झाले आहे.
भाजपच्या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच पक्षानेही कार्यकर्ते, पदाधिकार्यांना ताकद दिली. सध्या संघटनपर्वाच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तब्बल एक कोटी 51 लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. संघटन मजबुतीकरण व विस्ताराचा हा मोठा पल्ला पक्षश्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भरवशावर, त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आधाराने पूर्णत्वास गेला.
भाजप हा जगातील सर्वात मोठा व क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. 6 एप्रिल पक्षाचा स्थापना दिवस देशभरात, राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर तसेच पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. या वेळी जनसंपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गर्शनही प्रत्येक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या स्वरूपात घेतला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा गगगभेदी घोषणा देत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
यानिमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीने भारलेले होते आणि उपस्थितांनीही एकत्र येऊन राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper