शिवपुण्यतिथीनिमित्त दुर्गराज रायगडवर अभिवादन
महाड : प्रतिनिधी
गनिमांमुळे गुलामगिरीत गेलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मी लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळे जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकते, असे उद्गार केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी काढले. ते शनिवारी (दि. 12) शिवपुण्यतिथीनिमित्त दुर्गराज रायगडावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
किल्ले रायगडावर शिवरायांचा 345वा पुण्यतिथी कार्यक्रम श्री शिवाजी रायगड स्मारक स्थानिक उत्सव समितीमार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ना. अमित शाह यांच्यासह केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील पाटील, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे असंख्य शिवभक्त हजर होते.
या वेळी दुर्गअभ्यासक नीलकंठ रामदास पाटील यांना यंदाचा श्री शिवस्मृती रायगड स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. होळकर घराण्याचे वारसदार उदयसिंह होळकर, भारतीय सैन्यदलाचे अधिकारी लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांचादेखील सन्मान करण्यात आला. शिवराय मुद्रा स्मरणिका आणि धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचे प्रकाशनदेखील करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने शिवसमाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि स्वतःला आलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात परास्त होऊन इथेच त्याची कबर बांधली गेली, असे सांगून मी इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. ज्या किल्ल्यावर छत्रपतींनी अखेरचा श्वास घेतला तो किल्लाही हाच. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे आणि मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून आलो आहे, असेही ना. शाह म्हणाले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले.
RamPrahar – The Panvel Daily Paper