मनोजकुमारची वैशिष्ट्य सांगावीत तेवढी थोडीच. (जन्म 24 जुलै 1937), मृत्यू 4 एप्रिल 2025) अभिनेता, लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक व संकलन अशा चौफेर भूमिका साकारत आपली कारकीर्द घडवण्यात यशस्वी ठरलेला सिनेमावाला. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटातून त्यांनी देशभक्तीची भावना जागवली ती एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. त्यासह मनोजकुमारची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
मला मनोजकुमारची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, त्याचे गाण्याचे अतिशय जबरा आणि दृश्य माध्यमाचा उत्तम वापर केलेले टेकिंग, शब्द सौंदर्य व दृश्य सौंदर्याचा रूपेरी मिलाप. मनोजकुमारला काही उपग्रह वाहिनीवर श्रद्धांजली वाहताना मी प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख केला. आज चित्रपटांसाठी स्वतंत्र नृत्य दिग्दर्शक असतोच असतो, पूर्वीच्या काळातील चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, विजय आनंद, गुरूदत्त, राज खोसला, मनोजकुमार यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट रसिकांसमोर आणले आणि त्यात एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील गीत संगीत व नृत्य.
मनोजकुमार दिग्दर्शित चित्रपटात बघा, मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती (उपकार), पूरवा सुहानी आयी है, पुरवा (पूरब और पश्चिम), भारत का रहने वाला हू, भारत की बात बताता हू (पूरब और पश्चिम), एक प्यार का नगमा है…जिंदगी और कुछ भी नही (शोर), पानी रे पानी तेरा रंग कैसा (शोर)… ही त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील त्याचा सर्वोत्तम टच असलेली टॉप
फाईव्ह गाणी.
ही ’हिट लिस्ट’ आणखी वाढवता येईल. कोई जब तुम्हारा हृदय तोड दे (पूरब और पश्चिम), बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई (रोटी कपडा और मकान), प्रीत जगा की रित जगा (पूरब और पश्चिम), मै ना भुलूंगा (रोटी कपडा और मकान), जीवन चलने का नाम (शोर), कस्मे वादे प्यार वफा सब बाते है (उपकार) वगैरे. त्या काळात रेडिओपासून इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्सपर्यंत मनोजकुमार दिग्दर्शित चित्रपटातील ही गाणी हमखास ऐकली जाणारी आणि फर्स्ट रनला ज्युबिली हिट ठरलेले चित्रपट रिपीट रन वा मॅटीनी शोला आल्यावर पुन्हा पुन्हा पाहिले गेले. जुन्या काळातील चित्रपटांवर निस्सीम प्रेम करणे हे तर अनेक चित्रपटप्रेमींना विलक्षण आवडणारे.
’अभिनेता’ मनोजकुमारचे वेगळे मूल्यमापन होते. अगदी त्याच्या रूपेरी पडद्यावरील अभिनय आणि वावर यावर दिलीपकुमार शैलीचा प्रभाव असलेला दिसतो. यापासून देशभक्त नायक भारतकुमार अशी प्रतिमा असा तो ग्राफ आहे. पहिल्यात टीकेचा सूर तरी वाटचाल धीमी तरी विश्वसनीय. त्या काळातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात तो आहे अथवा होता. त्याच्याबद्दलच्या दुसर्या व्याख्येत चाहत्यांकडून आत्मियता, कौतुक आणि टीकाकारांकडून काहीशी हेटाळणी. तरी यशाचे गमक त्याच देशभक्त नायक याच प्रतिमेत आहे. त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ’उपकार’ (1967), नंतरचा ’पूरब और पश्चिम’ (1969) यातील त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव ’भारत’ असल्याचे रसिकांना आवडले आणि तीच त्याची ओळख व इमेज झाली. म्हटलं तर योगायोग, पण पथ्यावर पडलेला. ही इमेज त्याला केवल कश्यप निर्मित व एस.राम शर्मा दिग्दर्शित ’शहीद’ (1965)च्या यशाने आणि त्यात त्याने साकारलेल्या भगत सिंग या व्यक्तिरेखेला रसिकांची दाद मिळाली यातून तयार झाली.
मनोजकुमारच्या एकूणच दिग्दर्शनाचा पट मांडताना ’शोर’ बराच वेगळा आणि त्याचा खास टच असलेला चित्रपट. (मुंबईत प्रदर्शित 15 सप्टेंबर 1972) त्याची गोष्ट आज कदाचित फारच योगायोगाने भरलेली वाटेल, पण पन्नास बावन्न वर्षांपूर्वीच्या रसिकांना ती विलक्षण भारावून टाकणारी होती. प्रेक्षकांना भावनिक आनंद देणारी अशी होती.
आपल्या मुलाला (मा. सत्यजित) अचानक सामोर्या आलेल्या रेल्वे अपघातातून वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या आईचा (नंदा) दुर्दैवाने मृत्यू होतो. तिचा हा जिवघेणा अपघात पाहताना विलक्षण आक्रोश केल्याने मुलाची वाचा जाते. तो बोलू शकत नाही. पत्नीचा धक्कादायक मृत्यू आणि मुलावरचे संकट यामुळे शंकर (मनोजकुमार) हादरतो. मुलाच्या उपचारासाठी खूपच मोठा खर्च असतो. तेवढे पैसे आणणार कुठून? एकिकडे तो बराच वेळ सायकल चालवत पैसे मिळव वगैरे वगैरे गोष्टी करतो. दुसरीकडे त्याला आपल्या आई (कामिनी कौशल) व बहीणीची (बेबी नाझ) साथ आहे. दुसरीकडे त्याला खान बादशाह (प्रेमनाथ) आणि रानी (जया भादुरी) मदत करतात. याशिवाय तो नोकरीही करतो. कधी त्या कारखान्यात टाळेबंदी होते म्हणून शंकर व्यथित होतो. कुठे सहकार्य, तर कुठे अडथळेच. यातून मार्ग काढत काढत तो मुलाच्या उपचारासाठी पैसे जमवतो. अगदी मुलावर यशस्वी उपचार होतात. तो बोलूही
लागतो, पण त्याचा आवाज ऐकण्यासाठी अतिशय जीवापाड प्रयत्न केलेल्या शंकरचा कारखाना नेमका तेव्हाच सुरू होतो, त्यात अपघातात तो सापडतो आणि त्यात तो दुर्दैवाने बहिरा होतो.
हा भावूक क्लायमॅक्सच विलक्षण भावस्पर्शी (टचिंग) ठरला. रसिकांना गुंतवून ठेवत ठेवत अखेरीस अनपेक्षित धक्का देण्यात मनोजकुमार यशस्वी ठरला आणि येथेच पिक्चरचे यश पक्के झाले. त्या काळात अशा प्रकारच्या सामाजिक चित्रपटांचे वातावरण होते. राजेश खन्नाचा जबरा क्रेझ असलेला हा काळ होता. त्यात ’शोर’ फिट्ट बसला आणि हिट ठरला आणि मुंबईत मेन थिएटर ऑपेरा हाऊसला रौप्यमहोत्सवी यश संपादले. विशेष म्हणजे उपकार, पूरब और पश्चिम यांनीही याच ऑपेरा हाऊसला ज्युबिली हिट यश संपादन केले होते. ’शोर’ने ज्युबिली हिटची हॅट्ट्रिक केली. ’रोटी कपडा और मकान’ (1974)नेही येथेच पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना दक्षिण मुंबईतील आम्हा चित्रपट रसिकांना मनोजकुमारचा चित्रपट म्हणजे हमखास ऑपेरा हाऊसच असे नाते घट्ट झाले. (’उपकार’चे सुरुवातीला मेन थिएटर लिबर्टी होते इतकेच.) ’शोर’मध्ये मदन पुरी, असरानी, मनोरमा, मीना टी., मनमोहन, राज मेहरा, नाना पळशीकर, कृष्ण धवन, कुलजीत, व्ही. गोपाल इत्यादींच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण नरिमन इराणी यांचे आहे. या चित्रपटाची काही वर्षांनी ’ओसई’ या नावाने तमिळमध्ये रिमेक आला. चित्रपट हिट म्हणजे हे असे होणारच.
’शोर ’ची थीम मनोजकुमारच्या देशभक्तीच्या हुकमी फॉर्म्युल्यापेक्षा निश्चित वेगळी. ’रोटी कपडा और मकान’पासून मनोजकुमार फिल्मी झाला. पब्लिकला अमूकतमूक आवडेल असा समज करुन घेऊन देशभक्तीपर संवाद वगैरेवर भर देऊ लागला. त्याचा ’क्रांती’ (1981) चक्क सलिम जावेदची पटकथा व संवाद असलेला पिरियड सिनेमा. काही प्रसंग हास्यास्पद. सलिम जावेदकडून हा मागणी तसाच पुरवठा. मनोजकुमारच्या भारतकुमार प्रतिमेवर प्रेम असलेल्या त्याच्या हुकमी क्राऊडने पिक्चर हिट केले आणि एकदा जोरात सुरु असलेला चित्रपट मग बरेच आठवडे चालतच राहतो. मुंबईत मेन थिएटर अप्सरामध्ये पन्नास आठवड्यांचा भारी मुक्काम केला.
मनोजकुमार यानंतर आपल्याच देशभक्त नायक या प्रतिमेत अडकला आणि थीमपेक्षा हुकमी दृश्ये (नायिका पावसात चिंब भिजणे, एकादा बलात्कार वगैरे) यात गडबडला. याचा परिणाम म्हणजे, त्याच्या दिग्दर्शनातील ’क्लर्क’ (1989), ’जयहिंद’ (1996) दणकून आपटले. मला आठवतय, ’जयहिंद’च्या कमालीस्तान स्टुडिओतील शूटिंग रिपोर्टीसाठी आम्हा काही सिनेपत्रकारांना सेटवर बोलावले असता मनिषा कोईरालाची बराच काळ वाट पाहून मनोजकुमार कातावला होता. असे अनेक दिवस झाल्याने त्याने तेव्हाच ’पुरे झाले दिग्दर्शन’ असे ठरवले.
गाण्याचे व्यक्तिमत्व पडद्यावर खुलवणे हे त्याच्या यशस्वी दिग्दर्शनातील सर्वात मोठे वैशिष्ट्य. ’शोर’मधील संतोष आनंद यांनी लिहिलेली एक प्यार का नगमा है (पार्श्वगायक लता मंगेशकर व मुकेश), इंद्रजितसिंग तुलसी यांनी लिहिलेली जीवन चलने का नाम (मन्ना डे, महेंद्र कपूर व श्यामा चित्तर), पानी रे पानी तेरा रंग कैसा (लता मंगेशकर व मुकेश), वर्मा मलिक लिखित शहनाई बजे ना बजे (लता मंगेशकर) ही सगळी गाणी सहज ओठांवर येतात आणि गुणगुणत असताना त्यांचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येतेच हे मनोजकुमारच्या दिग्दर्शन व संकलनाचे यश आहे. (मनोजकुमारला या चित्रपटासाठी संकलनाचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला.) विशेष म्हणजे, पहिल्या दोन चित्रपटांना (उपकार आणि पूरब और पश्चिम) कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असूनही आणि गाणी आजही लोकप्रिय असूनही ’शोर’साठी मनोजकुमारने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची निवड केली. त्यांनीही कम्माल केली. सोपी चाल हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे पानी रे पानी, जीवन चलने का नाम, एक प्यार का नगमा अशा तीन गाण्यात आयुष्याचे तत्वज्ञान आहे आणि ते सोप्या शब्दात व साध्या चालीत आले आहे आणि ’शोर ’ पन्नास वर्षांनंतरही आजचा चित्रपट म्हणून रसिकांसमोर ठेवलयं… असे अनेक चित्रपट थिएटरमधून उतरले तरी रसिकांच्या मनात कायमचे
घर करतात.
मनोजकुमार अतिशय बहुरंगी, बहुढंगी सिनेमावाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विशेष उल्लेखनीय असा कलाकार. त्याच्या एका सर्वोत्तम कलाकृतीची ही दखल. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी ओटीटीवर मनोजकुमारचे कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळापासूनचे चित्रपट पाहत असेल त्यांनी मनोजकुमारच्या दिग्दर्शनातील शोर चित्रपट आवर्जून पहावा. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट युगातील एकेक करत अनेक लोकप्रिय कलाकार आज आपल्यात नाहीत. मोतीलाल, गुरुदत्त, पृथ्वीराज कपूर, बलराज साहनी, रेहमान, सोहराब मोदी, संजीवकुमार, राज कपूर, व्ही. शांताराम, मा. भगवान, शेख मुख्तार, राजकुमार, सुनील दत्त, विजय आनंद, दारासिंग, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, फिरोज खान, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शशी कपूर, देव आनंद, दिलीपकुमार आणि आता मनोजकुमार असे एकेक करत अनेक नायक काळाच्या पडद्याआड गेले. हे आणखी अनेक कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आपल्या कार्यकर्तृत्वाने कायमच आपल्यात राहतील. त्यांनी चित्रपट रसिकांना भरभरून आनंद दिला… आपल्या चित्रपटवेड्या देशात रूपेरी पडद्यावरील अगणित कलाकारांवर अमर्याद प्रेम केले जाते, म्हणूनच मनोजकुमारच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक जण हळहळले. जुन्या आठवणीत रमले, हरवले. त्यात एक चित्रपट आहे शोर.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper