पनवेल : वार्ताहर
‘पनवेल, उरण, खालापूर विभागातील शेकापच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पनवेलमधील कार्यालयात घेतली असता एकमुखाने सर्वांनी मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा आग्रह धरला तसेच या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या 7 मे रोजी स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत’, अशी घोषणा शेकापचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी सोमवारी (दि. 5) येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा चिटणीस गणेश कडू, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ, माजी नगरसेवक सुनील बहिरा, रवींद्र भगत, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज-म्हात्रे, पुष्पलता मढवी, सारिका म्हात्रे, सुरेखा मोहोकर, उद्योगपती हरिश्चंन्द्रसिंघ सग्गु, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, विलास मोहकर, युवा नेते जॉर्ज, एल.टी. पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जे.एम. म्हात्रे यांनी घेतला होता. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या आठमुठ्या धोरणावरही नाराजी व्यक्त केली. सोमवारी आपल्या समर्थकांची बैठक म्हात्रे यांनी पनवेल येथील गुरूशरणम कार्यालयात बोलावली होती. या बैठकीला शेकापचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी म्हात्रे यांनी आपली भूमिका जाहीर करून उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेतली असता त्यांनीसुद्धा भाजपमध्ये जाण्यास समर्थन दिले. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हात्रे यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भाजप प्रवेशाची तारीख व वेळ ठरली असल्याचेही त्यांनी सांगितले.
माझ्यासोबत प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये योग्य तो न्याय व मान-सन्मान मिळेल, अशी ग्वाही जे.एम. म्हात्रे यांनी दिली, तर विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे म्हणाले की, नागरी प्रश्नांच्या सोडवण्यासाठी आम्ही आग्रही होतो व आतासुद्धा पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवू. कोणत्याही अपेक्षेने व पदाच्या लालसेने आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक गणेश कडू यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper