दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा उत्साहात, जुन्या आठवणींना उजाळा
विटा ः प्रतिनिधी
किती सुंदर असतो ना तो क्षण जेव्हा शालेय वयातील मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येतात… वेगवेगळ्या वाटांवर चाललेली ही पाखरं पुन्हा एकदा एकत्र गोळा झाली आणि मनात दडून बसलेल्या आठवणींना एक नवा श्वास मिळाला… निमित्त होते सांगली जिल्ह्यातील माहुली येथील महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या 1987च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळ्याचे. प्रेमळ आणि हृद्य वातावरणात हृद्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
गेल्या वर्षभरापासून काही जणांच्या मनामध्ये विचार घोळत होता की, आपल्या दहावीच्या जुन्या सवंगड्यांना एकत्र आणले पाहिजे, एकमेकांची ख्याली खुशाली विचारली पाहिजे. मग काही मंडळी कामाला लागली. म्हणतात ना, लोग आते गये, और कारवाँ बनता गया. मग त्यांनी वॉटस्अॅपवर ग्रुप बनविला आणि चर्चा सुरू झाली.
चंद्रकांत कुंभार, अजित देशमुख, प्रकाश बाबर, नानासाहेब पवार, शिक्षक डी.एस. भोसले, अण्णा जगताप या काही जणांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि विचार पुढे आला की, पहिला स्नेहमेळा प्रकाश बाबर यांच्या वलखड येथील फार्महाऊसवर घेऊया. तारीख ठरली 3 जून सायंकाळी 6 वाजता. या कार्यक्रमासाठी मटणाचा खास बेत करण्यात आला होता. बघता बघता 35 जण या स्नेहमेळ्यासाठी हजर राहिले. बरेच जण अडचणींमुळे येऊ शकले नाहीत, पण ही सुरुवात होती… हेही नसे थोडके.
जसजसे विद्यार्थी पोहचू लागले तस तसे काही जणांना गहिवरून आहे. सर्वजण एकामेकांना आलिंगन देत विचारपूस करू लागले. थोड्याफार जणांना ओळखण्यासाठी मेंदूलाही थोडा जोर द्यावा लागत होता. सायंकाळी सर्व जण एकत्र आल्यावर 7 वा. स्नेहमेळ्यास सुरुवात झाली. माहुली गावचे अजित देशमुख यांनी प्रस्तावना केली आणि सर्व 1987च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आजच्या धावपळीच्या युवात थेट संवाद हरवत चालला आहे. बरेच दिवसांपासून मनात होते की, सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि तो दिवस आज आला. सर्वांना पाहून फारच समाधान आणि आनंद झाला आहे. भविष्यात काही अडचणीतील मित्रांना मदत करण्यासाठी काही निधी जमा करूया, असेही त्यांनी विचार या वेळी व्यक्त केले.
या स्नेहमेळ्याकरिता खास चंद्रकांत कुंभार हे आबुधाबीवरून गावी आले होते. त्यांनाही आपल्या गावची ओढ गप्प बसू देत नव्हती, तर शेजारील चिखलहोळ गावचे रशिद मुलाणी हे सध्या ठाणे येथे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. त्यांनाही याबाबत माहिती मिळाली आणि ते लगोलग या कार्यक्रमासाठी खासकरून उपस्थित राहिले.
या वेळी शिक्षक शिवाजी माळी बोलताना म्हणाले की, आमचे शिक्षक आम्हाला सांगायचेे की, कुठलेही व्यसन शरीरासाठी फार वाईट असते अन् तेव्हापासून मी व्यसनापासून लांबच रााहिलो. एवढा बदल अशा शिक्षकांमुळेच होऊ शकतो.
राजेंद्र बारसिंग यांनीही आपले मत या वेळी व्यक्त केले की, आता आपला मोठा ग्रुप तयार झाला असल्याने एखादा चांगला उपक्रम आपण सुरु करू शकतो. तसेच जिथे आपण शिकलो, त्या शाळेचे ऋणही आपण विसरता कामा नये. त्यासाठी आपणास काही करता येईल का? यावरही सर्वांनुमते विचार व्हायला हवा, असेही
ते म्हणाले
प्रकाश बाबर, चंद्रकांत कुंभार, अजित देशमुख, नानासाहेब पवार, शिक्षक डी. एस. भोसले, अण्णा जगताप, एस.के. माने, रशिद मुलाणी, सयाजी कोरडे यांनीही त्यावेळच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शशिकांत बारसिंग व्यस्त वेळापत्रकामुळे उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी आपल्या शुभेच्छा आवर्जुन दिल्या. त्यावेळचे शिक्षण, एनसीसी कॅम्पची धमाल, दहावीचा अभ्यास तसेच शिंदे सर, रावताळे सर, ससे सर, थोरात सर, जाधव मॅडम आणि सर यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळच्या स्नेहमेळाव्यासाठी महिला येऊ शकल्या नाहीत. म्हणून सर्वांनुमते पुन्हा मोठ्या प्रमाणात स्नेहमेळा जिथे आपले शिक्षण झाले त्या महात्मा गांधी विद्यालय, माहुली येथे घेण्याचे ठरले. सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यावर पुन्हा लवकरच भेटू अशी मनाशी खूणगाठ बांधून एकमेकांचा निरोप घेतला.
RamPrahar – The Panvel Daily Paper