Breaking News

शूटिंगच्या शिफ्टचा वाद असू शकतो?

चित्रपटाच्या चित्रीकरणाचे (शूटिंग) वेळापत्रक असते. अमिताभ बच्चनसारख्या वक्तशीर कलाकाराने ते वर्षानुवर्ष पाळले म्हणून आज वयाच्या त्र्यऐंशीव्या वर्षीदेखील तो त्याच उत्साहात कार्यरत आहे, बिझी आहे. वेळेची किंमत त्याने केव्हाच ओळखली. याउलट गोविंदाने कधीच सेटवर येण्या-जाण्याच्या वेळा सांभाळल्या नाहीत. त्याच्याकडे बहुतेक शोभेचे घड्याळ असावे… काटे नसलेले. हे त्याचे गुण त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटाच्या (शीबू मित्रा दिग्दर्शित इल्जाम, ईस्माईल श्रॉफ दिग्दर्शित लव्ह 86) सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी गेल्यावर अनुभवले आणि मग गोविंदाच्या चित्रपटाच्या सेटवर उशिराच जायची सवय चित्रपटसृष्टीत भटकंती करणार्‍या आम्हा सिनेपत्रकारांनी लावून घेतली. चित्रपटसृष्टीत वावरताना, फिरताना अनेक गोष्टी शिकता येतात त्या अशा.
ही गोष्ट आजच का सांगतोय? तर चित्रपटसृष्टीत सध्या शूटिंगची शिफ्ट या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. चित्रपटसृष्टीतील शूटिंग शिफ्ट दिवसभरात तीन असतात. सकाळ, दुपार व रात्र. त्या लांबल्या की ज्युनियर आर्टिस्ट, ज्युनियर डान्सर, कामगार व तंत्रज्ञ यांच्या मानधनात वाढ होते. (हा चित्रपटसृष्टीतील कामगार संघटनांच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय).
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि दीपिका पदुकोण यांच्यातील वादावरून शूटिंगची शिफ्ट ही ही चर्चा सुरू झाली. संदीप रेड्डी वांगा हा साऊथच्या चित्रपटांचा दिग्दर्शक. कबीर सिंग (2019), निमल (2023) या चित्रपटांमुळे तो जास्त फोकसमध्ये आला. (त्या चित्रपटात प्रचंड हिंसा होतीच म्हणा) त्याचा व दीपिकाचा वाद नेमका कसला? (दिग्दर्शक व कलाकार यांच्यातील वाद हे नवीन नाही. सदियो से चलता आ रहा है)
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दीपिकाने लेकीला जन्म दिला हे तुम्हालाही माहित्येय. यानंतर ती वांगा यांच्या ’स्पिरिट’ चित्रपटातून कमबॅक करणार होती. चित्रपटाची निवड चांगली होती. व्यावसायिकदृष्ट्या ते योग्यही होते. तिने वांगा यांच्यासमोर आठ तास शिफ्टची मागणी केली तसंच 20 कोटींचं मानधन, प्रॉफिट शेअर याही अटी ठेवल्या. वांगा यांनी अटी अमान्य करत तिला सिनेमातून बाहेर काढलं. आपला निर्णय स्पष्ट केला. यावर चित्रपटसृष्टीतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होतेच.
आता दीपिकाची शिफ्टची मागणी योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. काजोलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत काजोल म्हणाली, मी एकावेळी एकाच सिनेमावर काम करते. एका वेळी चार-चार सिनेमे मी कधीच केले नाहीत. एक संपल्यानंतरच मी दुसर्‍या सिनेमाचं काम सुरू करायचे. मी कधीच 20-30 तास काम केलं नाही. एका मर्यादित वेळेतच काम करायचं हे माझं स्पष्ट होतं. यात मला माझ्या आईनेही (तनुजा) साथ दिली होती.
ती पुढे म्हणाली, माझी मुलगी नीसाचा जन्म झाल्यावर मला वर्क लाईफ बॅलन्स करणं अवघड जात होतं. अशा वेळी मला माझा नवरा अजय देवगण आणि इतर निर्मात्यांनीही मदत केली. निर्माते काहीही अडकाठी न घेता माझ्या गरजांप्रमाणे चालायचे. यू मी और हम सिनेमावेळी माझे वडील (शोमू मुखर्जी) रुग्णालयात होते. तेव्हा अजय निर्माता व दिग्दर्शकही होता आणि तो मला लवकर घरी जाण्याची परवानगी द्यायचा. त्यामुळे मला काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधता आला.
काजोलसारखाच अनुभव इतरांनाही येईल असे अजिबात नाही. मुंबईत शूटिंगच्या वेळा गाठणे ट्रॅफिकमुळे अडचणीचे असते असे वर्षानुवर्ष म्हटले जातेय. याउलट युरोपमध्ये दिवस मोठा असतो आणि अन्य गोष्टी फार नसतात म्हणून उशिरापर्यंत अधिक प्रमाणात चित्रीकरण केले जाते असेही प्रचलित आहे. आऊटडोअर्स लोकेशनवर शूटिंग करण्याचे असे काही फायदेही.
चित्रपटसृष्टीत वावरताना वेळ पाळली तर तुमच्याकडे फार काम नाही (वा नसावे) असा एक गोड गैरसमज आहे. याउलट तुम्ही शक्य तितके उशिरा आलात तर तुम्ही फार बिझी आहात असा समज होतो असाही एक समज आहे. राजेश खन्ना जबरदस्त फॉर्मात असतानाच हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद (1971)मधील भूमिका त्याने स्वीकारली, पण ते करताना आपण शूटिंगसाठी रोज दोन तास नक्कीच देऊ असा वादाही केला. राजेश खन्नाच्या कारकिर्दीतील हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट हे पुन्हा वेगळे सांगायलाच नको, पण एके दिवशी राजेश खन्नाला सेटवर यायला बराच उशीर झाला. यावर हृषिदा रागावले आणि त्यांनी राजेश खन्नाकडे दुर्लक्ष केले. अखेर रमेश देव यांनी अतिशय चतुरपणे मध्यस्थी केल्यावर शूटिंग सुरू झाले, हा किस्सा खुद्द रमेश देव यांनीच मला एकदा सांगितला.
मनिषा कोईराला कायमच सेटवर येण्या जाण्याबाबत बेपर्वा होती याचे अनेक किस्से आहेत. तुम्हाला आठवतेय, अनुपम खेर व ती असे दोघे सवाल दस करोड का असा एक कौन बनेगा करोडपती शैलीतील (खरंतर ती नक्कलच होती, न जमलेली) शो करीत होते. 2001 सालची गोष्ट. अर्थात, अमिताभ बच्चनशी स्पर्धा शक्यही नव्हती आणि योग्यही नव्हती. त्याची उंचीच भारी, पण जे जे सुपरहिट ते ते आपणही करावे हा चित्रपटसृष्टीचा स्वभाव, त्याला कोण काय करणार? या शोच्या शूटिंगच्या वेळेस अनुपम खेरला मनिषा कोईरालाची बराच काळ वाट पहावी लागत होती आणि त्यात वेळापत्रक गडबडायचे. मनिषा कोईरालाच्या याच वागण्याला मनोजकुमार पुरता कंटाळून गेला आणि त्याच्या दिग्दर्शनातील जयहिंद चित्रपट पूरता रखडला. मनिषाने मात्र यावर काय म्हटले माहित्येय? सेटवर कलाकार येण्याबाबत पद्धत बदललीय हे मनोजकुमार यांना माहीत नाही? बिचारा मनोजकुमार. त्याने साठच्या दशकात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल चित्रपटातून काम करायला सुरुवात केली आणि अर्धा एक तास सेटवर उशिरा येणे समजू शकते अशा वातावरणात त्याने यशस्वी वाटचाल केली, स्वत:ला घडवले. त्याला आज नव्हे तर उद्याच मनिषा कोईरालाने सेटवर येणे कसे मान्य होईल?
एकदा सुलोचनादीदींकडून मला दिलीपकुमार सेटवर येण्याबाबतची छान माहिती मिळाली. दिलीपकुमार शक्यतो सकाळची 7 अथवा 9 वाजतानाची शिफ्ट पसंत करीत नसे. दुपारी 2 ते रात्री 10 ही दिलीपकुमार यांची शक्यतो आवडती शिफ्ट आणि एकदा का सेटवर पाऊल टाकले की दिलीपकुमार अन्य कशाचाच विचार करणार नाही. एखाद्या दृश्याचे चित्रीकरण लांबत लांबत गेले आणि त्यात शूटिंगची शिफ्ट संपली तरी दिलीपकुमार आपले त्या दृश्याचे चित्रीकरण सुरू ठेवत. रात्रीचे अकरा साडेअकरा झाले तरी चालेल, पण ते दृश्य आजच पूर्ण करूयात. उद्या नव्याने ते सुरू करताना त्या दृश्यात तसाच रंग भरला जाईलच असे नाही. त्यापेक्षा आजच ते अधिकाधिक परिपूर्ण करूयात हा त्यांचा बाणा होता. कलाकार उगाच मोठा होत नसतो. त्यात असे अनेक लहान मोठे घटक असतात. अगदी चित्रीकरण शिफ्टचेही असतात हेच यावरून दिसते.
अक्षयकुमारचे नवीन चित्रपट वरच्या वर प्रदर्शित होत असतात यामागे शूटिंग शिफ्टचे नियोजन हेदेखील एक टॉनिक आहे. सकाळी लवकर उठून व्यायाम, ठीक 9 वाजता चित्रपट स्टुडिओत प्रवेश, संध्याकाळी शूटिंग संपल्यावर वेळीच घरी, देर रात तक चालणार्‍या फिल्मी पार्ट्यांचे अजिबात आकर्षण नाही. अतिशय शिस्तबद्ध वाटचाल. त्याचा साजरा राजेश खन्नाचे सगळेच याच्या उलट होते. रवि टंडन दिग्दर्शित नजराना या चित्रपटाचे चेंबूरच्या एसेल स्टुडिओतील कोर्टाच्या सेटवर शूटिंग असतानाचा अनुभवच सांगतो. आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टिंगसाठी या सेटवर आमंत्रित करण्यात आले होते. चित्रपटात राजेश खन्ना, स्मिता पाटील व श्रीदेवी असे भारी कलाकार. सेटवर जायलाच हवे हे वेगळे सांगायलाच नको. सेटवर पाऊल टाकताच दिसले ते दिग्दर्शक रवि टंडन हे स्मिता पाटील व श्रीदेवी यांच्यावर कोर्ट रूम ड्रामा चित्रीत करीत आहेत आणि राजेश खन्ना आपल्या सवय व आवडीप्रमाणे दुपारी एक-दीड वाजता येणार आहे आणि खरंच तसाच तो आला. लगेचच लंच ब्रेक झाला. सेटबाहेर एका मोठ्या टेबलावर त्याच्या घरून आलेल्या भल्या मोठ्या डब्यातील शाकाहारी व मांसाहारी जेवण लावण्यात आले. राजेश खन्नाला कशाचीच घाई नव्हती, मात्र आपले ताट हाती घेण्यापूर्वी त्याने आजूबाजूस पाहिले. आणि कॅमेरामनच्या सहाय्यकास जेवलास का? नसशील तर हे ताट घे असे म्हणाला. (हीदेखील त्याच्या व्यक्तीमत्वाची एक बाजू). जेवण झाल्यावर 3 वाजता त्याच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू झाले. तात्पर्य, राजेश खन्ना आपल्या वेळेनुसार आपल्या शूटिंगची शिफ्ट करीत होता असे म्हणता येईल. काही झाले तरी तो राजेश खन्ना होता हे विसरू नका.
दैनंदिन मालिकांच्या युगात हे शिफ्टचे समीकरण काही वेगळेच झाले. एका दिवसात 20 मिनिटाच्या एका एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण व्हायलाच हवे (अन्यथा एकादा कलाकार जाऊदेत, अगदी एखाद्या दिग्दर्शकाचीही गच्छंती होऊ शकते).
चित्रीकरणाची शिफ्ट हा खूपच मोठा विषय आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. आजच्या काळातील निर्मिती संस्था याबाबत प्रचंड व्यावसायिक आहेत. लेखी करारातच चित्रीकरणाचे स्पॉट, दिवस, वेळ, मानधन, प्रमोशनसाठीचा वेळ हे सगळेच देतात. काही कलाकार त्याच्यातूनही आपल्या फायद्याचे मार्ग काढतातही. या सगळ्यातून चित्रपट, मालिका, इव्हेन्टस, जाहिरातपट, लघुपट, माहितीपट यांचे अफाट पीक येणे सुरू आहे. तेच तर महत्त्वाचे आहे असेच म्हणायचे काय?

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply