नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
बहुजनांच्या शिक्षणाचा आधारवड डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती सोमवारी (दि. 22) वाशी येथील केबीपी कॉलेज व मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे, तर अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते. त्या वेळी ते बोलत होते.
केबीपी कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत, अविनाश लाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. पी.सी. पाटील, मॉडर्न स्कूलच्या प्राचार्य सुमित्रा भोसले, केबीपी कॉलेजच्या प्राचार्य शुभदा नायक यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र धामणे यांना कर्मवीर पुरस्कार, तर डॉ. सुचेता धामणे यांना लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
Check Also
कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक
कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper