कर्जत, नेरळ: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी कर्जत शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी बुधवारी (दि.1) पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले.
पनवेल येथील भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जेष्ठ नेते रमेश मुंढे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश लाड, नेरळ मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता नितीन कांदळगावकर आदी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत जोशी यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
भालचंद्र जोशी हे 2009 ते 2014दरम्यान मनसेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना कर्जत शहरप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली होती. काही काळ राजकीय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जोशी हे सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असून कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सर्व शाखीय ब्राह्मण सभा आणि विविध संस्थांमध्ये सक्रिय आहेत. मागील कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता. त्यांच्या प्रवेशामुळे कर्जत शहरातील भाजप अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper