पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि.5) रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. या वेळी स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारूशीला घरत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, डॉ. सुरेखा मोहकर, सारिका भगत, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष रूचिता लोंढे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमित ओझे, चिन्मय समेळ, प्रतीक बहिरा, स्वप्नील ठाकूर, गुरूनाथ लोंढे, केदार भगत, संजय जैन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, आपण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. अनेक उपक्रम सेवा भावनेतून राबवले जातात. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. या प्रसंगी आपण सगळेजण भावूक होतो. मुग्धाताईंचे अचानक जाणे हे आजही आपल्यासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या स्मृती पुढे जागवत असताना त्या नेहमीच सर्वांना मदतीचा हात देत असत याच सेवाभावातून स्व. सौ. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणारे समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम वर्षभर लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत हीच मुग्धाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल.
रक्तदान आणि आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या सामाजिक कार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान केले. समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सेवाभावाचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अमित ओझे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. हा उपक्रम युवानाद ढोल पथक, कच्छ युवक संघ आणि कन्या आरोग्य मंदिर यांच्या सहकार्याने यशस्वीपणे झाला.
Check Also
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …
RamPrahar – The Panvel Daily Paper