आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील विविध ठिकाणी जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 10) पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले तसेच एमएसईबीचे अधिकारी डी.आर. पाटील यांच्यात बैठक झाली. दरम्यान, गुरुवारीही या विषयावर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.
शुक्रवारी झालेल्या बैठकीदरम्यान एमएसईबीच्या अधिकार्यांनी संप मागे घेतल्याची कबुली दिली तसेच पुढील एक ते दीड तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, वीजपुरवठा खंडित करण्यामागे जबाबदार ठरलेल्या कर्मचार्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वाच्या बैठकीला भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक अजय बहिरा, केदार भगत, प्रितम म्हात्रे, रूपेश नागवेकर, पवन सोनी, उमेश इनामदार, एनपी बिल्डर्सचे प्रशांत पाटील तसेच ओरियन मॉलचे पूर्णंदू साळवी यांच्यासह स्थानिक व्यापारी व उद्योजकही उपस्थित होते.
या बैठकीनंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संपाच्या आडून नागरिकांना त्रास देणार्यांवर संतप्त ताशेरे ओढले. त्यांनी म्हटले की, पनवेलपासून खारघरपर्यंत विविध ठिकाणी परवापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिक प्रचंड संतप्त झाले होते. त्यांनी एमएसईबी, एमएसईडीसीएल पोलीस ठाणे गाठले. संपाचा गैरफायदा घेत जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडले. पनवेलच्या बाजारपेठेत तर प्रचंड प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. मोहोल्ला विभागातील नागरिकांची लाईट नव्हती, एसटी डेपो व रेल्वेस्थानकानजीक झोपडपट्टीमध्येही तीच परिस्थिती होती. त्यामुळे काहींनी रास्ता रोको केला. ही वेळ ज्यांच्यामुळे आली ज्यांनी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित केला आणि कुठला वीजपुरवठा खंडित करायचा हे ज्ञान आहे अशाच लोकांनी ते कृत्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची डीसीपी प्रशांत मोहिते यांच्यासोबतच्या बैठकीत केली आहे. आता संप मिटला आहे, मात्र कुणी विनाकारण वीजपुरवठा बंद केला तर आम्हाला कळवा, आमचे भाजपचे पदाधिकारी निश्चितच या संदर्भात पाठपुरावा करतील. नागरिकांना त्रास झाला आहे, त्याच्यावर ईलाज झाला पाहिजे आणि पुन्हा अशा पद्धतीने मनमर्जी करत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील दोषींना शासन करावे, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आकस्मिक संपामुळे पनवेल शहर आणि परिसरात वीजपुरवठा ठप्प होऊन नागरिकांसमोर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीवर तातडीने मार्ग काढावा यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पनवेलमधील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती तातडीची पावले उचलण्याची विनंती केली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर काही वेळातच संप मिटून वीजपुरवठा पूर्ववत झाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper