Breaking News

पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोने इमारती, प्रकल्प उभारले, मात्र नियोजनाअभावी पाणीपुरवठा करण्यात ते अपयशी ठरले आहेत. या कारणाने सिडकोच्या वसाहती भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात योग्य प्रकारे सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर पाण्यासंदर्भात अशीच स्थिती राहिली तर लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्व नागरिकांना घेऊन सिडकोविरोधात तीव्र जनआंदोलन उभारीन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी गंभीरतेने काम करत नसल्याने नागरिकांना सणासुदीच्या काळातही पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी सण-उत्सवाच्या काळात पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे काही अधिकारी मुद्दामहून नागरिकांना अडचणीत टाकत आहेत का, अशी शंका निर्माण झाली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, पाण्याचे टँकर वाटपसुद्धा काही अधिकारी मनमानी पद्धतीने करत आहेत. नागरिकांच्या रोषाचा मुख्य भार लोकप्रतिनिधींवर येत असताना सिडको अधिकारी मात्र बेफिकीर वृत्तीने वागत आहेत. ही परिस्थिती अत्यंत संतापजनक असून तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह सिडकोविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सिडकोला ‘शहरांचे शिल्पकार’ म्हणवून घ्यायचे असल्यास नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा देणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. ’शहरांचे शिल्पकार’ असे मिरवणार्‍या सिडकोला त्याच्या अंतर्गत नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था करता येत नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे सध्या पनवेल परिसरात सिडको प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष आहे. वेळेवर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन हाच पर्याय उरेल, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. जोपर्यंत पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी, सीसी- ओसी देऊ नयेत तसेच नवीन भूखंडांचे वाटप थांबवावे, अशी पुनर्मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.
पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था स्वयंचलित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली असून पाणीपुरवठा विभागातील निष्काळजी व बेशिस्त अधिकारी-कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल याची खातरजमा करावी, असेही निवेदनातून अधोरेखित केले आहे.
सिडको अधिकार्‍यांसोबत झालेल्या अनेक बैठकांद्वारे पनवेल विधानसभा क्षेत्र अंतर्गत सातत्याने होत असलेल्या अपुर्‍या पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वारंवार सूचित केले आहे व प्रशासनाचा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, या वर्षी अजूनपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनसुद्धा, सर्व धरणे भरली असूनदेखील पनवेल अंतर्गत खारघर, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा अशा ठिकाणी लोकांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्याबाबत सिडकोचे अधिकारी काहीही उत्तर देत नाहीत. पाणीटंचाईअभावी पाण्याचे टँकर देताना हे अधिकारी अत्यंत मनमानी पद्धतीने त्याचे वाटप करतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे टँकर दिले जातात असा माझा ठाम आरोप आहे. सिडको प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा सर्व रोष, संताप हे नागरिक लोकप्रतिनिधींवर काढत असतात, मात्र सिडकोचे अधिकारी मजा करत असताना लोकांचा विनाकारण रोष लोकप्रतिनिधींवर निघत आहे. त्यातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर बर्‍याच ठिकाणी लोकांना पाणीटंचाई जाणवत आहे व त्यामुळे नागरिकांमध्ये सिडकोविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
पाणीपुरवठा सुधारण्याकरिता, त्यात वाढ करण्याकरिता तसेच त्यामधील अनियमितता कमी करण्याकरिता मी सिडको प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत, मात्र त्यावर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सिडकोविरोधात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता असून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला सर्व नागरिकांना घेऊन सिडकोविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी आणि वेळप्रसंगी सिडको कार्यालयाला टाळे लावायलादेखील मागेपुढे पाहणार नाही इतकी लोकभावना तीव्र आहे व त्याची सर्व जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील आणि अशी परिस्थिती उद्भवू नये असे वाटत असेल तर तातडीने या प्रश्नी लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित करा, असा समजवजा ईशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply